रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. शिंदे सेनेचे राजन साळवी यांच्या मुलाला, अथर्व साळवी यांना, प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींसाठी हा अनपेक्षित झटका मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 15 हा साळवी यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा भाग आहे. याच वॉर्डमधून राजन साळवी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि पुढे रत्नागिरीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यामुळे अथर्व साळवी यांना या प्रभागातून उमेदवारी मिळणे जवळजवळ निश्चित मानले जात होते. मात्र शिवसेनेने अचानक हा प्रभाग भाजपला देण्याचा निर्णय घेतल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
शिवसेना-भाजपच्या चर्चेनुसार दोन पर्याय विचाराधीन आहेत—एकतर ही जागा थेट भाजपकडे देणे किंवा भाजपमधील एखाद्या आयात नेत्याला शिवसेनेत प्रवेश देऊन त्याला उमेदवारी देणे. यामुळे प्रभाग 15 मध्ये नवे राजकीय तणाव निर्माण झाले आहेत.
अथर्व साळवी यांची उमेदवारी नाकारल्याने राजन साळवी नाराज असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शिंदे गटातील स्थानिक नेतृत्वात मतभेद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यातील वाढत्या दुराव्याची चर्चा पुन्हा जोर धरू शकते.आता प्रभाग 15 अखेरीस कोणत्या पक्षाकडे जाणार, तसेच नाराज राजन साळवी पुढील राजकीय पावले कशी उचलणार, याकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply