मुंबई: मराठा साम्राज्याच्या इतिहासाला उजाळा देणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आज (सोमवार) मुंबईत घडणार आहे. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्रात परत येत आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावात ही तलवार जिंकून ती पुन्हा आपल्या भूमीवर आणली आहे. लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली असून आज सकाळी १० वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या तलवारीचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने ‘सेना साहेब सुभाष पराक्रम दर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात या ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन आणि लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या तलवारीचे उद्घाटन व लोकार्पण होणार आहे. राज्याच्या इतिहासातील ही एक गौरवशाली बाब मानली जात आहे. मराठा साम्राज्याच्या शौर्याचे प्रतीक असलेली ही तलवार पुन्हा महाराष्ट्रात परत आल्याने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या तलवारीमुळे महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे. ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन प्रथम पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे करण्यात येणार असून त्यानंतर ती इतर ठिकाणीही प्रदर्शनासाठी उपलब्ध केली जाईल. ही तलवार केवळ एक शस्त्र नसून मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहे. तिचे पुनरागमन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धीला एक नवा आयाम देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या तलवारीच्या परत येण्याने भावी पिढीला आपल्या इतिहासाची अधिक जवळून ओळख करून देण्याची संधी मिळेल.
Leave a Reply