राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार यांनी पदभार स्वीकारला; सोनिक सेवानिवृत्त

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मावळत्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सोनिक या आज वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या आणि त्यांनी २४ जून २०२४ रोजी हे पद स्वीकारले होते. राजेशकुमार, जे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांचे नाव मुख्य सचिवपदासाठी आघाडीवर होते. ते १९८८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत आणि ऑगस्ट २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांना पुढील काही महिन्यांसाठी या पदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोण येणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

या पदासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार यांना संधी दिली असली, तरी त्यांच्या निवृत्तीनंतर चहल आणि गगराणी यांच्यात स्पर्धा असेल.
सुजाता सोनिक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी निरोप दिला. सोनिक यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे प्रशासनातील एका मोठ्या पर्वाचा समारोप झाला आहे. राजेशकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश सोमवारी काढण्यात आला असून, त्यांनी तात्काळ पदभार स्वीकारला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *