छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीत या चित्रपटाची प्रशंसा केली होती. या चित्रपटामुळे संभाजी राजांचे पराक्रम आणि विचार देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचले आहेत.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना ‘छावा’ चित्रपट दाखवण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी मंत्रालयासमोरच्या चित्रपटगृहात आमदारांसाठी हा खास शो आयोजित केला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात दिली.
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, वढू आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ते म्हणाले, साहित्य संमेलनाला सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत ही केवळ ‘उपकार’ म्हणून नाही, तर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी दिली जाते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साहित्यिक विजय दर्डा यांनी दिल्लीत मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र भवन उभारावे अशी मागणी केली होती. यावर प्रतिसाद देताना अजित पवार यांनी दिल्लीमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याची घोषणा केली. या भवनासाठी निधी मंजूर केला जाईल आणि त्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र सदन हे खासदार आणि आमदारांसाठी असले तरी दिल्लीतील मराठी व्यक्ती आणि साहित्यप्रेमी यांना एकत्र येण्यासाठी स्वतंत्र भवन असावे, यासाठी अर्थसंकल्पात हा विषय मांडला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिला आणि त्याच्या प्रभावी सादरीकरणाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट सध्या हिंदीत उपलब्ध असला तरी, तो मराठीत आणावा, अशी लोकांची अपेक्षा आहे. चित्रपटातील संभाजी महाराजांचे जीवन चरित्र पाहताना अंगावर शहारे येतात, त्यामुळे हा चित्रपट मातृभाषेत असावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी ‘सरहद’ संस्थेच्या कार्याबद्दलही एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले. राज्यभर गाजत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, विचार आणि बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा हा प्रयत्न निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.

”राज्यातील सर्व आमदारांना दाखवणार ‘छावा’ चित्रपट” – अजित पवार
•
Please follow and like us:
Leave a Reply