जगातील सर्वात उंच पुतळ्याचे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली.२५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे. त्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा स्टेच्यु ऑफ युनिटीचं डिजाईन तयार केलं होतं.मागील अनेक दिवसांपासून राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत होती. या मागणीची दाखल घेत अखेर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाले आहे.

 

मागच्या 100 वा वाढदिवस साजरा करणारे राम सुतार यांना याआधी 1999 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार यांचं वय १०० वर्षं आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली.

कोण आहेत राम सुतार? त्यांचा जीवन परिचय

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.

राम सुतार यांनी आत्तापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *