तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात तसेच मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खुल्या पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात त्यांनी सुळे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नातेसंबंधांचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विषयी केल्या जाणाऱ्या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पाटील यांनी सांगितले की, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला, मात्र त्या क्षणापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतेच होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपानंतरही पक्षाने त्यांना बाहेर काढले नव्हते, याची आठवणही त्यांनी सुळे यांना करून दिली. दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असतो, या बाबीवर सुळे यांच्यासह सर्वजण ठाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपशिलात जात पाटील यांनी दावा केला की, स्थानिक महिलांनी निवडणुकीच्या काळात त्यांचे लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना संदेशाद्वारे माहिती देऊन, गुन्हे शाखेशी सहकार्य करणाऱ्यांना जोडून दिले. परंतु, तपासात सहकार्य करणाऱ्यांनाच आरोपी बनविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
शताब्दी रुग्णालयातील निविदेबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, तेरणा ट्रस्टने केवळ निविदेत सहभाग घेतला असून, यात कोणतीही गैरव्यवहार झालेली नाही. यापूर्वीच्या निविदांमध्ये कोणी सहभागी न झाल्याने तेरणा ट्रस्टने पुढाकार घेतल्याचेही त्यांनी म्हटले. शेवटी, कोणत्याही शंका असल्यास प्रत्यक्ष भेटून सर्व दस्तऐवजीकरणासह स्पष्टीकरण देण्याची तयारी असल्याचे पाटील यांनी सुळे यांना सांगितले.


Leave a Reply