रणजी ट्रॉफी उपांत्य फेरी; मुंबईला विदर्भाची तगडी टक्कर!

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा स्टार खेळाडूंनी भरलेला संघ आणि उत्साहात असलेला विदर्भ आमनेसामने येणार आहेत. सोमवारपासून नागपूरच्या जामठा स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार असून चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

मुंबईकडे अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी सामन्याची दिशा बदलू शकतात. मात्र, विदर्भाचा संघ तितकाच जोशात असून तो मुंबईला जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, पण मुंबई आत्मविश्वासात
दुखापतीमुळे यशस्वी जैस्वाल मुंबई संघातून बाहेर पडला असून तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचारासाठी जाणार आहे. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात राखीव खेळाडू म्हणून त्याचा समावेश असणार आहे. जैस्वालच्या अनुपस्थितीचा परिणाम होऊ नये यासाठी मुंबई संघ व्यवस्थापन विशेष काळजी घेत आहे. हा सामना गतवर्षीच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती ठरणार आहे. त्या वेळी मुंबईने विदर्भचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मुंबईचा संघ ४२ वेळा रणजी चषक जिंकला असला तरी त्यांचा निर्धार आणि अनुभव त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो.

मुंबईच्या फलंदाजीची कसोटी
मुंबईच्या टॉप ऑर्डरला या हंगामात सातत्याने संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे संघासाठी शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियान यांसारख्या खालच्या फळीतील फलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी चमकदार खेळ करत संघाला तारले आहे. हरयाणाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने ११३ धावांवर ७ गडी गमावले होते, पण मुलानी आणि कोटियान यांनी १८३ धावांची भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले. नागपूरच्या खेळपट्टीवर मुंबईचा संघ फलंदाजीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल.

विदर्भाचा संघही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांचे प्रमुख गोलंदाज हर्ष दुबे, यश ठाकूर आणि नचिकेत यांनी सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. तर यश राठोड, करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर हे फलंदाज देखील उत्तम फॉर्मात आहेत. त्यामुळे विदर्भाचा संघ घरच्या मैदानावर मुंबई समोर मोठे आव्हान उभे करू शकतो.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *