मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आरे ते कफ परेड मेट्रो-३ सेवा मंगळवारी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या भूमिगत मेट्रोला पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख आठ हजारांहून अधिक प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. पुढील दिवशी ही संख्या वाढून १ लाख २१ हजार २७६ वर पोहोचली, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.
ही मेट्रो मुंबईच्या दक्षिण टोकावरील कफ परेडपासून आरेपर्यंत जोडली असून, चर्चगेट, गिरगाव, महालक्ष्मी, वर्ली, सायन, धारावी, कलिना, बांद्रा-कुर्ला संकुल आणि सीप्झपर्यंत प्रवास सुलभ झाला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या या सेवेमुळे कामकाजाच्या वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी दिसली. सरासरी तासागणिक २१ हजार प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केल्याची नोंद झाली.
मेट्रो-३ मुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि शहरातील रस्त्यांवरील ताणही घटेल. दर ९० सेकंदांनी एक मेट्रो सुटेल, अशी व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. उद्घाटनावेळी सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवन स्थानकावरील एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. ते लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
‘आरे ते कफ परेड’ मेट्रो-३ मुंबईकरांसाठी केवळ वाहतुकीचा पर्याय नसून, शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मेट्रो मार्गिकेवरील प्रवासीसंख्या पाहता, ही सेवा आगामी काही दिवसांत मुंबईकरांची पहिली पसंती ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply