यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे. हे झाड म्हणजे अत्यंत मौल्यवान रक्तचंदनाचे झाड असून त्याच्या किमतीवरून सुरू झालेल्या न्यायालयीन लढ्याने आता शेतकऱ्याच्या बाजूने कलाटणी घेतली आहे.
शिंदे यांच्या ७ एकर शेतीमध्ये असलेल्या या झाडाचे महत्व त्यांनाही अनेक वर्षं माहिती नव्हते. मात्र, २०१३-१४ साली वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू असताना कर्नाटकातून आलेल्या अधिकाऱ्यांनी या झाडाची ओळख रक्तचंदन म्हणून केली आणि त्याच्या अफाट मूल्याबद्दल माहिती दिली. हे समजल्यावर शिंदे कुटुंब स्तब्ध झाले.
नंतर रेल्वे प्रशासनाने या भूभागाचे भूसंपादन केले. मात्र, झाडाचे बाजारमूल्य देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे शिंदे कुटुंबाने खाजगी मूल्यांकन करून घेतले, ज्यात झाडाची किंमत तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपये एवढी ठरवण्यात आली.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी रेल्वे प्रशासनास १ कोटी रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश दिले. त्यापैकी ५० लाख रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.
झाडाचे अंतिम सरकारी मूल्यांकन अद्याप बाकी आहे. यानंतर झाडाची किंमत ५ कोटी रुपयांवर जाऊ शकते, असे शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. न्यायालयानेही झाडाचे संपूर्ण आणि अधिकृत मूल्यांकन करून शिंदे यांना संपूर्ण मोबदला द्यावा, असे आदेश दिले आहेत.
रक्तचंदन, ज्याला लाल चंदन असेही म्हणतात, हे टेरोकार्पस सॅन्टलिनस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. या झाडात लालसर रंगाचा रस असतो, त्यामुळे त्याला “रक्तचंदन” असे नाव मिळाले. याचे लाकूड लालसर असून सुगंध नसतो. हाडदुखी, सांधेदुखी यावर याचा लेप लावल्यास आराम मिळतो. त्वचाविकार, डाग, पिग्मेंटेशन, मुरुम यावरही याचा उपयोग केला जातो. त्यामुळे आयुर्वेदात रक्तचंदनाला विशेष स्थान आहे.
सामान्य शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या एका दुर्लक्षित झाडामुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचा हा अनोखा प्रसंग आहे. ही घटना केवळ प्रेरणादायकच नाही तर नैसर्गिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि कायदेशीर मार्गाने हक्क मागण्याचे महत्त्वही अधोरेखित करते.
Leave a Reply