राज्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी जाहीर केले की, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी करण्यात येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी प्रतिनिधी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच संबंधित विभागांचे सचिव, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून ती एप्रिल 2026 पर्यंत शिफारसी सादर करेल. त्या आधारे पुढील तीन महिन्यांत म्हणजेच 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी होईल.
फडणवीस म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा रब्बी हंगामाची पेरणी धोक्यात येईल.” यासाठी सरकारने 32,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
आत्तापर्यंत 8,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, या आठवड्याअखेर आणखी 18,500 कोटी रुपये वितरित करण्यात येतील. पुढील पंधरा दिवसांत 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत ही घोषणा करण्यात आली असून, आगामी काळात या निर्णयामुळे राज्यातील शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.


Leave a Reply