मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईत पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपात होईल का, हा प्रश्न भेडसावत होता. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी कपातीची चिंता नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरी, महाराष्ट्र शासनाने निभावणी साठ्यातून पाणी उपलब्ध केले आहे, असे सांगण्यात आले आहे. मात्र पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, 31 जुलै 2025 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणारे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी कपातीचा कोणताही विचार सध्या करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाशी सातत्याने समन्वय साधून पावसाच्या संभाव्य स्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जलाशयांमध्ये किती साठा?
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दि. 5 मे 2025) महापालिका मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 5 मे 2025 रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण 22.66 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांतून ‘निभावणी साठ्या’तून अतिरिक्त पाणीपुरवठ्यास मान्यता दिली आहे.
Leave a Reply