मुंबई : महानगरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ॲपआधारित कॅब सेवांचे भाडे परिवहन विभागाने अखेर निश्चित केले असून, आता ओला-उबरसारख्या टॅक्सींचे बेसिक भाडे प्रति किलोमीटर २२.७२ रुपये असेल. प्रवाशांच्या तक्रारी, चालकांच्या मागण्या आणि ॲप कंपन्यांच्या धोरणांवर अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर ऑक्टोबर १८ पासून हे नवीन नियम लागू होणार असल्याची माहिती परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कलस्कर यांनी दिली.
नवीन दरांनुसार, मागणीच्या शिखरकाळात भाडे १.५ पट वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच, अशा वेळी प्रवाशांना प्रति किलोमीटर ३४ रुपये मोजावे लागतील. तर मागणी कमी असलेल्या कालावधीत २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळून प्रति किलोमीटर भाडे केवळ १७ रुपये राहील. त्यामुळे प्रवाशांना दर स्थिर आणि पारदर्शक राहतील, तर चालकांनाही किमान दर मिळण्याची हमी राहील.
सध्या ॲपआधारित कंपन्या मागणीच्या वेळेनुसार ४६ ते ४८ रुपये किंवा त्याहून अधिक भाडे आकारत होत्या. तर काहीवेळा मागणी कमी झाल्यास अवास्तवरीत्या कमी भाडे आकारले जात होते. यामुळे प्रवासी गोंधळलेले असत, तर चालकांना तोटा सहन करावा लागत असे. आता सरकारच्या धोरणामुळे या दोन्ही अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, ॲपआधारित टॅक्सी चालक संघटनांनी वारंवार दरवाढ आंदोलनाची चेतावणी दिली होती. शासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता होती. रोज लाखो प्रवासी या सेवांचा लाभ घेत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला असता. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
भाडेवाढीच्या अंतिम धोरणाबाबत प्रवासी, चालक आणि ॲप कंपन्यांकडून आलेले आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. सर्व घटकांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
नवीन नियमानुसार प्रवाशांना स्पष्टता मिळेल, तर चालकांनाही न्याय्य मोबदला मिळेल. त्यामुळे ओला-उबर सेवा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply