लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान “तुतारी वाजवणारा माणूस” या निवडणूक चिन्हासारखे दिसणारे “पिपाणी” चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी मोठे डोकेदुखीचे ठरले होते. बीड आणि सातारा या दोन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये या साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, ज्याचा फटका थेट शरद पवार यांच्या गटाला बसला.
मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये हा गोंधळ टळणार आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत चिन्हांच्या यादीतून “पिपाणी” हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा दिलासा मिळाला असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
“तुतारी वाजवणारा माणूस” हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत चिन्ह आहे. परंतु “पिपाणी” हे चिन्ह आकार व स्वरूपाने त्याच्याशी बऱ्याच अंशी साम्य असलेले असल्याने अनेक मतदार गोंधळले. बीड आणि सातारा येथे या गोंधळामुळे मतविभाजन झाले आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना अप्रत्यक्ष फायदा झाला, अशी तक्रार पवार गटाने आयोगाकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह कायमचे यादीतून वगळल्याने शरद पवार गटासाठी निवडणुकीत आता स्पष्टता आणि पारदर्शकता राहील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत करत आहेत.


Leave a Reply