पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; सोहम सुर्वे IIT JAM मध्ये देशात तिसरा

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सोहम राजेश सुर्वे याने IIT JAM (जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) एमएस २०२६ या स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स या विषयात मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. IIT JAM ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि चिकाटी आवश्यक असते. सोहमने याच गुणांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे हे फलित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

सोहमच्या या यशामागे त्याची नियमित अभ्यासाची सवय, विषयावरील सखोल समज आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याने कोणत्याही दबावाखाली न येता नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केली. त्यामुळेच पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठे यश त्याने मिळवले आहे. या यशाबद्दल त्याचे वडील राजेश सुर्वे आणि आई लीना राजेश सुर्वे यांनी आनंद व्यक्त करत मुलाचे कौतुक केले. “आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या मेहनतीने आणि जिद्दीने हे यश मिळवले आहेस. पुढील आयुष्यातही अशीच प्रगती करत राहा,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सोहमचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही मोठी कामगिरी साध्य करता येते, याचे उत्तम उदाहरण सोहमने घालून दिले आहे. भविष्यातही तो असेच यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *