नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे. या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६५ जणांना अटक केली असून, मध्य नागपुरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी दंगल रोखण्यासाठी मध्य नागपुरातील अनेक भागांत संचारबंदी लागू केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत हा आदेश जारी केला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत तो लागू राहणार आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत अटक करण्यात आलेल्या ६५ दंगलखोरांपैकी ५१ जणांना (त्यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश) न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री महाल परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्वतः महालमध्ये पथसंचलन करत कठोर कारवाईचा इशारा दिला. त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, ”परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे” मंगळवारी कोणतीही नव्याने हिंसक घटना घडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या २५० कार्यकर्त्यांनी मुघल बादशाह औरंगजेबच्या समाधीच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांनी घोषणाबाजी करत गवताने तयार केलेल्या प्रतीकात्मक कबरला आग लावली. या घटनेनंतर पोलिसांनी निदर्शकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, संध्याकाळी अफवा पसरली की या बनावट कबरीवर धार्मिक ग्रंथ असलेली चादर टाकण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळच्या नमाजानंतर सुमारे ४००-५०० लोक चिटणीस पार्क येथील अत्तर रोडवर एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड करण्याची धमकी दिली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले. मात्र, रात्री ७.३० च्या सुमारास भालदारपुरा येथे १५० जणांचा दुसरा गट जमला आणि परिस्थिती आणखी चिघळली.
रात्री महाल परिसरात १,००० हून अधिक जणांच्या जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. या हाणामारीत तीन उपायुक्त (DCP) जखमी झाले. विशेषतः झोन ५ चे DCP निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. सध्या ते ICU मध्ये उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या हाताला २६ टाके घालण्यात आले आहेत. जमावाने अनेक वाहने पेटवली, घरे फोडली आणि एका क्लिनिकची तोडफोड केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क घालून धारदार शस्त्रे, लाठ्या आणि बाटल्या घेऊन परिसरात उधळपट्टी केली. हंसापुरीतील लहान व्यापारी एस. गुप्ता यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चार दुचाकी पेटवण्यात आल्या. ते स्वतः या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या शेजाऱ्याच्या दुकानाचीही लूट झाली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचायला तब्बल एक तास उशीर झाला. एका महिलेने सांगितले की, आगीचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिकांनी पहिल्या मजल्यावरून पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला. वसंत कावळे नावाच्या व्यापाऱ्याने सांगितले की, ”दंगलखोरांनी जाणीवपूर्वक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे फोडले आणि घरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला” एका टपरी चालकाच्या मते, ”हल्लेखोरांनी मेडिकलमध्ये घुसून औषधांचा नाश केला आणि त्यानंतर माझ्या टपरीची तोडफोड केली.”
विदर्भ विश्व हिंदू परिषदचे सरचिटणीस राजकुमार शर्मा यांनी आरोप केला की, ”हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि स्थानिक मशिदीच्या मौलवीने जमावाला भडकावले. आम्ही त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करतो.” दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जखमी नागरिकांची रुग्णालयात भेट घेतली. केंद्रीय नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांना टोला लगावत म्हटले की, ”पोलिसांना या पूर्वनियोजित हल्ल्याची माहिती मिळाली नव्हती का?’दरम्यान, मध्य नागपुरातील अनेक शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, संचारबंदी लागू असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Leave a Reply