बुलढाणा: समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंजजवळील रस्त्यावर जोरदार पावसामुळे पाणी साचून रस्त्याने अक्षरशः नदीचे रूप धारण केले होते. २६ जून रोजी मेहकर आणि लोणार तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या जलनिस्सारण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक जवळपास दीड तास थांबली होती.
नेमके काय घडले?
हा महामार्ग ५४८ सीचा भाग असून, मेहकर इंटरचेंजजवळील रस्त्याचा उतार जास्त असल्यामुळे आणि तो भाग सखल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की त्याने संपूर्ण इंटरचेंज परिसर पाण्याखाली गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात समृद्धी महामार्गावरील इंडिकेटर बोर्डजवळून पाणी वेगाने वाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कारण काय?
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हा भाग सखल असल्यामुळे तिथे पाणी साचले. २४ तासांत अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नव्हती, त्यामुळे पाणी साचत गेले.
‘तो भाग आमचा नाही’ – एमएसआरडीसी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने स्पष्ट केले आहे की, पाणी साचलेली जागा ही समृद्धी महामार्गावरील मुख्य मार्ग नसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी (National Highway 548C) वरील ‘व्हिक्युलर अंडरपास’ (Vehicular Underpass) चा भाग आहे. हा अंडरपास समृद्धीच्या उन्नत (elevated) रचनेखाली येतो. त्यामुळे मुख्य समृद्धी मार्ग पूर्णपणे सुरळीत सुरू होता. समृद्धी महामार्गाचे अधीक्षक अभियंता आदिनाथ भोसले यांनी सांगितले की, “ही घटना २५ आणि २६ जूनच्या जोरदार पावसामुळे घडली. त्यामुळे अंडरपासमधील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि जलनिस्सारणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.”समृद्धी महामार्गाला ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग’ असल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच दमदार पावसात अशी स्थिती उद्भवल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेने महामार्गाच्या संलग्न रस्त्यांवरील जलव्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Leave a Reply