महाकुंभ २०२५ मध्ये यंदा अनेक साधू-साध्वी विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते माजी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी. ग्लॅमरच्या जगातून निवृत्ती घेत, ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या मार्गावर निघाल्या आहेत. गृहस्थ जीवनाचा त्याग करून, त्या भगव्या वस्त्रांत सजून प्रयागराजच्या महाकुंभात दाखल झाल्या. शुक्रवारी किन्नर आखाड्याच्या सेक्टर क्रमांक १६ मधील शिबिरात त्यांचा पट्टाभिषेक झाला. त्यांनी संन्यासाची दीक्षा घेत, संगमच्या पवित्र काठावर पिंडदान केले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. ममता कुलकर्णींना किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडलेश्वर पदवीने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांचे नाव आता ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ असे ठेवण्यात आले आहे.
महाकुंभातील त्यांच्या आगमनाने भाविकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. त्यांनी गंगेच्या पवित्र जलात स्नान केले, संतांचे आशीर्वाद घेतले आणि किन्नर आखाड्याच्या व्यवस्थेचे भरभरून कौतुक केले.
ममता कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “ग्लॅमरच्या जगापेक्षा देवाची सेवा करणे हेच खरे पुण्य आहे. माझे चाहते नाराज असतील, पण मी आता अध्यात्माला वाहून घेतले आहे.”
ममता कुलकर्णी यांनी १९९१ मध्ये तमिळ चित्रपट ‘नन्नाबर्गल’ मधून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. पुढील वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘मेरे दिल तेरे लिए’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. परंतु, त्यांना खरी ओळख १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ मधून मिळाली. सलमान खान, शाहरुख खान आणि काजोलसोबत त्यांनी राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटात भूमिका साकारली होती.
त्यानंतर ‘नसीब’, ‘सबसे बड़ा खिलाडी’, ‘घातक’, ‘वक्त हमारा है’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, चित्रपट कारकीर्दीतून अचानक गायब झालेल्या ममताचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले, तसेच डॉन विकी गोस्वामीसोबत तिचे संबंधही चर्चेत राहिले. यानंतर ममता चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या आणि आता त्या नव्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करत आहेत.
Leave a Reply