बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलची “मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” अभियानांतर्गत उत्तुंग भरारी

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान शासनाने राबविले होते . सदर अभियानाचे शासनामार्फत केंद्र पातळी, तालुका पातळी व जिल्हा पातळीवर परीक्षण करण्यात आले. राज्यामधिल सर्व शाळांचा सहभाग असलेल्या या अभियानाच्या टप्पा – २ यात शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सु.पे.ह. हायस्कूल बोर्डी, या शाळेची जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांकाने निवड करण्यात आली . या यशामध्ये मा.प्राचार्या सौ. बिनिता शहा , उपप्राचार्या सौ.रचना तंडेल यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमामुळे हे साध्य झाले. संस्थेचे सर्व माननीय पदाधिकारी तसेच पालघर विभागाचे विभागीय सचिव माननीय श्री प्रभाकर राऊत सरांकडून सातत्याने लाभलेल्या प्रेरणा आणि अमुल्य मार्गदर्शन यामुळे हे घवघवित यश प्राप्त झाले .

 

शिक्षणाची पंढरी असे संबोधिले जाणार्‍या सु.पे.ह. हायस्कूल बोर्डी या शाळेला, १२०वर्षे पूर्ण झाली असुन देश स्वतंत्र व्हायच्या आधी मिठाचा सत्याग्रह , चलेजाव चळवळ अशा अनेक चळवळीत या शाळेतील शिक्षकांनी योगदान दिले आहे. आचार्य भिसे गुरुजी , चित्रे गुरुजी , मदनराव राऊत ,आत्माराम पंत सावे अशा नामवंत शिक्षकांचा वारसा शाळेला लाभलेला असुन पुज्य साने गुरुजी व अनेक तत्कालीन नेत्यांनी या शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांना वेळोवेळी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे.

 

बोर्डी परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा साठी शहरात जाण्याची पाळी येवू नये म्हणून संस्थेचे विभागीय सचिव तथा माजी प्राचार्य प्रभाकर आत्माराम राऊत यांच्या प्रयत्नाने महाविद्यालयीन शिक्षणाची देखील सुविधा येथे उपलब्ध झाली आहे त्यांच्या एका धनिक मित्राने तथा माजी विद्यार्थ्याने कॉलेजची इमारत स्वतः बांधून दिली आहे. बोर्डी आणि परिसरातिलच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यामधिल तसेच उंबरगाव – वापी आणि गुजराथ मधिल जवळपासच्या सर्व समाजातील तळागाळातील गरीब विशेषत आदिवासी विद्यार्थ्यांना आता थेट पोस्ट ग्रॅज्युएट , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी आधुनिक शिक्षणाच्या संधी येथे उपलब्ध झाल्या असुन या विद्यालयातून शेकडो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून देशाच्या उन्नतीला हातभार लावीत आहेत.

 

शाळेचे अनेक आजी – माजी विद्यार्थी कृषी , मत्स्य व्यवसाय , लघु उद्योग ,फलोत्पादन , वैद्यकीय व्यवसाय , पत्रकारीता या सारख्या विविध क्षेत्रामध्ये तसेच शासकीय तथा खाजगी प्रशासन सेवा अश्या अनेक क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. शासनामर्फत राबविल्या जाणार्‍या विविध याजनां तसेच उपक्रमांमुळे शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील ह्यात शंकाच नाही. शाळेला प्राप्त झालेल्या या पुरस्कारामुळे बोर्डी व संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

लेखक: निरंजन आत्माराम राऊत

ज्येष्ठ पत्रकार आणि निवृत्त अधिकारी, माहिती आणि जनसंपर्क विभाग, महाराष्ट्र शासन

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *