क्रिकेट जगतात असंख्य विक्रम रचणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीमार्फत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे विशेष क्रिकेट प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. प्रारंभी, महानगरपालिका शाळांमधील २४० विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यांना तीन दिवसांचे खास प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर, त्यातील उत्कृष्ट ४० खेळाडूंची (२० मुले व २० मुली) अंतिम निवड करण्यात येईल.
अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीमार्फत संपूर्ण वर्षभर मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय, या विद्यार्थ्यांना सरावासाठी आवश्यक असणारी संपूर्ण क्रिकेट किटही अकॅडमीकडून मोफत पुरवली जाणार आहे. त्यामुळे उत्कृष्ट क्रिकेटपटू घडवण्यासाठी कोणत्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत.
उद्घाटन सोहळ्यात सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबर मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, कठोर मेहनत घ्यावी आणि खेळावर निस्सीम प्रेम करावे, असा मौल्यवान सल्लाही त्यांनी दिला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक क्रिकेटपटूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या मते, या प्रशिक्षण कार्यक्रमातून भविष्यात देशासाठी चमकदार क्रिकेटपटू घडू शकतात. विद्यार्थ्यांना क्रिकेटच्या प्रत्येक अंगाचे बारकावे शिकवले जातील आणि त्यांना खेळासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येतील. या निर्णयामुळे नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीचा हा स्तुत्य उपक्रम, भविष्यातील क्रिकेटपटू घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
Leave a Reply