सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी; ‘घरात घुसून बॉम्बने उडवू’ असा व्हॉट्सॲप संदेश, पोलिसांकडून तपास सुरू

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने ही धमकी पाठवली असून, या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या व्हॉट्सॲप संदेशात सलमान खानच्या निवासस्थानी घुसून त्याला बॉम्बच्या स्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच, त्याच्या वाहनावर बॉम्बद्वारे हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्तीचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू आहे. सायबर गुन्हे शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या पार्श्वभूमीवर, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांच्या तक्रारीसाठी खुले असून, त्या माध्यमातून अनेकदा निनावी संदेश किंवा अफवा प्राप्त होत असतात. मात्र, अशा प्रकारचा धमकीवजा संदेश प्राप्त झाल्यास पोलिसांकडून तो तत्काळ संबंधित यंत्रणांकडे सुपूर्त केला जातो.

गेल्या काही वर्षांपासून सलमान खानला अनेक वेळा अशा स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या निवासस्थानाबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याच्या वापरातील वाहनांची सुरक्षा तपासणीही नियमितपणे केली जात आहे. त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली असून, सलमानने स्वतःसाठी बुलेटप्रूफ वाहनही खरेदी केले आहे. सध्या सलमान खान हा आपल्या आगामी चित्रपट सिकंदरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत त्याला या धमक्यांविषयी विचारण्यात आले असता, त्याने अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया देत म्हटले, “भगवान, अल्लाह सगळं त्यांच्यावर आहे. जितकी वेळ आयुष्याची लिहिलीय, तितकीच आहे. काही वेळा इतक्या लोकांना सोबत घेऊन फिरावं लागतं, तेव्हा जरा अवघड जातं.” ही धमकी समोर आल्यानंतर सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून धमकी पाठवणाऱ्या क्रमांकासह संदेशाचा तपशीलवार तपास सुरू असून, गुन्हेगार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *