छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर विरोधकांनी मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. अखेर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या ‘धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल चालवते. या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने, सिद्धांत शिरसाट यांनी, हॉटेलची बाजारभावनुसार ४९० कोटी रुपये किंमत असूनही केवळ ६७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप दानवे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केला. नोंदणीकृत कंपनी नसतानाही सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने टेंडर प्रक्रियेत भाग घेऊन ते पात्र ठरले आणि बनावट कागदपत्रांचा वापर केला गेल्याचाही आरोप दानवे यांनी केला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “पारदर्शकता म्हणून अटी-शर्ती किंवा इतर प्रक्रियेत अनियमितता झाली आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल,” अशी घोषणा केली.
यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “सरकारने वेदांत प्रकरणाची पूर्णतः सखोल चौकशी करावी, माझी काहीही हरकत नाही. त्या लिलाव प्रक्रियेतून संबंधित संस्थेने माघार घेतलेली आहे.”
इतर नेत्यांनी केली चौकशीची मागणी
माजी खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) यांनी व्हिट्स हॉटेल खरेदी हे एक वेगळे प्रकरण असून पालकमंत्र्यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, यामुळे अनेक प्रकरणे बाहेर येतील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply