‘समृद्धी’वर संस्कृती संवर्धनाची नवी संकल्पना; ठाणे-नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर झळकली वारली चित्रकला आणि लोकसंस्कृती

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे.
अभियांत्रिकी आव्हानाचा समृद्ध यशस्वी टप्पा
समृद्धी महामार्गाच्या ७०१ किमी लांबीपैकी ६२५ किमी लांबीचा भाग सध्या वापरात आहे, ज्याचा दीड कोटीहून अधिक वाहनचालकांनी लाभ घेतला आहे. आता इगतपुरी ते आमने हा ७६ किमीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या टप्प्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधून मार्ग काढण्यासाठी अभियांत्रिकी कौशल्याची कसोटी लागली आहे. या भागात एकूण पाच बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी ११ किमी आहे. यातील इगतपुरी येथील ७.७८ किमी लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब बोगदा ठरला आहे, ज्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या आठ मिनिटांत पार करता येईल.
वारली कला आणि स्थानिक लोकसंस्कृतीची जोड
ठाणे जिल्ह्यातील आमने इंटरचेंजहून समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी बोगद्यांवर वारली चित्रकला रेखाटण्यात आली आहे. निसर्गरम्य डोंगर-दऱ्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर या चित्रकलेमुळे प्रवास अधिक मोहक बनतो. एक ते दीड महिन्याच्या कालावधीत या चित्रकलेचे काम पूर्ण झाले आहे. वारली चित्रकलेसोबतच इगतपुरी बोगद्यावर विपश्यनेचे महत्त्व आणि स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय आदी विषयांवर आधारित चित्रे साकारण्यात आली आहेत.
ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील वारली कलेच्या माध्यमातून महामंडळाने स्थानिक कला आणि लोकसंस्कृतीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, या कलाकृतींमुळे केवळ सौंदर्यवृद्धीच होत नाही, तर महामार्गाच्या प्रवासात संस्कृतीचा संगमही अनुभवता येतो. महामार्गावर या पद्धतीने संस्कृती संवर्धन करण्याचा हा अनोखा प्रयत्न भविष्यातही इतर प्रकल्पांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *