साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकी मानत पुस्तक – वाचन चळवळ चालवणारे लोभस व्यक्तिमत्त्व सतीश काळसेकर यांचा आज चौथा स्मृतीदिन…
पेण येथील कवी,लेखक, कलाकार, चित्रकार, पत्रकार यांनी एकत्र येऊन बांधलेल्या “चित्रकुटिर” मध्ये ते अखेरपर्यंत राहिले. त्या निसर्गरम्य गृहसंकुलाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कारण विविध विचारांच्या, स्वभावाच्या प्रतिभावंतांना बांधणारा काळसेकर एक भक्कम दुवा होते.
साठोत्तरी मराठी साहित्यात बंडखोर लेखन परंपरा निर्माण करणारा लिटल मॅगझिनचा प्रभावी प्रवाह होता. नामदेव ढसाळ, तुळशी परब, राजा ढाले, दि. पु चित्रे प्रभुतींचा जो “लिटल मॅगझिन” नामक दबाव गट होता, काळसेकर त्याचे बिनीचे शिलेदार होते. रोजच्या खडतर जगण्यापासून दूर काल्पनिक रम्य नंदनवनात रमलेल्या मराठी कथा, कादंबरी, नाटक , कवितेला या आक्रमक तरूणाईने “जमिनीवर” आणले होते. समाजाला भानावर आणणारे, आपल्या अवती-भवती घडणारे, वास्तवदर्शी लेखन केले होते. साठोत्तरी विचार वादळाने, फक्त साहित्यच नाही, तर आंबेडकरी, आदिवासी, साम्यवादी, कामगार, शेतकरी आणि महिला आंदोलनांना वैचारिक बैठक देण्याचे महत्वपूर्ण काम केले. म्हणूनच “लिटल मॅगझिन” चळवळीचे महत्त्व फार मोठे आहे.काळसेकर यांच्या जाण्यामुळे त्या समष्टीच्या हक्कासाठी लढणाऱ्या काळाचा दुवा निखळला आहे… शिवाय व्यक्तिगत पातळीवर म्हणायचे तर, माझा लेख, मुलाखत आवडली तर आवर्जून फोन करणारे. अथर्व, सुमेधा, आम्हा सगळ्यांवर माया करणारे, माझा दिवंगत मित्र ऋत्विजचे बाबा, हे त्यांचे माझ्या व्यक्तिगत जीवनातील नाते कधीच विसरता येणार नाही.
अनोळखी माणसांनाही जीव कसा लावावा, माणसे कशी जोडावी आणि सख्य कसे जपावे, हे ते आपल्या आचरणातून शिकवीत.
काळसेकरांची माझी पहिली ओळख १९९१~९२ मध्ये त्यांच्या “पुस्तकांच्या संग्रहाविषयी ” या कवितेतून झाली होती. आमच्या विद्यापीठ वसतीगृहातील कवी श्रीधर तिळवे यांच्या माध्यमातून “पोस्टर पोएट्री” प्रकाशनाचे प्रयोग सुरू होते. जातीय दंगलीने भडकलेली, पोळलेली मुंबई पुन्हा माणूसपणाच्या वाटेवर यावी यासाठी चांगले काव्य चित्र-शब्द कलाकृतीव्दारे लोकांसमोर नेण्याचा सारा खटाटोप सुरू होता. आल्हाद भावसार, मंगेश बनसोड या कवींच्या बरोबर मी पण त्या उपक्रमात सहभागी होतो. त्या कवितांमध्ये काळसेकर यांच्या “पुस्तकांच्या संग्रहाविषयी” कवितेचे पोस्टरही होते…
तो काळ भलताच वेगवान होता. तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी खाजगीकरण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्याने, अर्थकारण उसळी घेऊ पाहत होते. त्याचवेळेस देशात धर्मकारण आक्रमक आकार घेत होते. बाबरी मशिद पडणे आणि देशाच्या आर्थिक राजधानीत आणि इतरत्र जातीय दंगलीचा आगडोंब उसळणे, या घडामोडींनी अवघा देश ढवळून निघाला होता. स्थित्यंतराच्या त्या ऐन सुरुवातीलाच, १९९१ मध्ये मी पत्रकारितेत उतरलो होतो. तो काळ भलताच भारलेला होता. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हत्या असे नाही. पण स्वतः पेक्षा समाज हिताचे विषय, सामाजिक, सांस्कृतिक आणि
वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचे होते. सध्याच्या काळात बरोबर उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत आल्यावर, ‘मुंबई सकाळ’ मध्ये पत्रकारिता करताना , आधी फक्त पुस्तकात दिसणार्या, लेखक, कवींच्या ओळखी होत होत्या. हिंदी, इंग्लिश वाचनाला सुरुवात झाली होती.
कवीवर्य श्रीधर तिळवेंच्या साथीने, त्यांच्यासारखाच, खिशात दमडी नसताना, भूक मारून पुस्तकं वाचण्याचा, जमविण्याचा नाद लागलेला होता. त्यामुळे पहिल्याच दर्शनात काळसेकरांची कविता जाम आवडून गेली. माझ्या हॉस्टेलमधील खोलीतील भिंतीवर ती पोस्टर रूपाने आरूढ झाली.
“तरीही… पुस्तके विकता येत नाहीत, भाकरीसाठी ! ”
ही कवितेची शेवटची ओळ तर पंचविशीच्या आयुष्याचे तत्वज्ञान बनली… मग असाच एक दिवस ऋतू… ऋत्विज भेटला, डिसेंबर १९९४मध्ये. तेव्हा दैनिक-साप्ताहिकांची चलती होती. त्याकाळात “आज दिनांक” ने सीएनएन नामक न्यूज चॅनेल काढले होते. ज्या दिवसात फक्त दूरदर्शनचा बोलबाला होता. त्याकाळातील ते झी पाठोपाठ आलेले मराठी चॅनल होते. ऋत्विज काळसेकर तेथे काम करीत असे. विलक्षण देखणा, बोलका आणि पारदर्शक स्वभावाचा ॠतु माझ्या “वाॅरंट रॅकेट गौप्यस्फोट ” बातमी संदर्भात मुलाखत घेण्यासाठी आला होता… मुलाखत झाल्यावर आम्ही कयानी रेस्टॉरंटमध्ये गेलो. तेव्हा त्याने मला आग्रहाने फोर्ट मधील लोकवाड़मय गृहात, पीपल्स बुक हाऊसमध्ये नेले आणि आपल्या बाबांशी, सतीश काळसेकरांची ओळख करून दिली….
आणि त्यांना हेही सांगितले, की “याची हाॅस्टेलची रुम तुमच्या कवितेने सजली आहे…” काळसेकर मंद हसले आणि घरच्या माणसासारखे माझी राहण्या, जेवणाची व्यवस्था कशी आहे याबद्दल बोलत राहिले… आमच्या पहिल्या भेटीतच हे असं अनौपचारिक नातं जुळलं. मग पुढे माझ्या – सुमेधाच्या लिखाणामुळे, नवीन पुस्तकांमुळे, पेण येथील चित्रकुटिर मधील घरी जाण्यामुळे, फोनवरील गप्पांमुळे हे नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं… एक तपापूर्वी अचानक ऋत्विज गेला आणि कोविड काळात काळसेकर सर गेले…
आज ते असायला हवे होते, असे नेहमी वाटते. खासकरून, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या “चित्रकुटीर” मधील ‘कबीरा’, बंगल्याजवळून जातो, तेव्हा काळसेकर पती-पत्नी आणि त्यांचे प्रेमळ वागणे हमखास आठवते…. आणि मन भरून येतं.
स्ट्रगलच्या काळात जगण्याची प्रेरणा ठरलेली त्यांची ‘ती’ पुस्तक प्रेमाची विलक्षण कविता आणि एखाद्या कार्यक्रमात अचानक मागून येणारी “काय रे” ही कोकणी हेल काढून मारलेली मायेची हाक, पाठीवर मारलेली प्रेमाची थाप… आयुष्यात कधीच विसरता येणार नाही… अशा या सर्वसामान्यांच्या भावनांना, कल्पनांना शब्दरूप देणाऱ्या लोककवीला भावपूर्ण श्रध्दांजली !
Leave a Reply