मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेली छाननी प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता थांबवण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नोंदणी केलेल्या सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.
काय आहे प्रकरण?
‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील मंजूर झालेल्या महिलांना दरमहा १९०० रुपये आर्थिक लाभ मिळतो. राज्यात सध्या १ कोटी ३४ लाख लाभार्थी असून, या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला ५० हजार कोटींचा बोजा पडतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर या योजनेतील अर्जांची छाननी करून अपात्र महिलांना वगळण्याची घोषणा सरकारने केली होती.
छाननीची प्रक्रिया आणि सध्याची स्थिती
अपात्र महिलांना वगळण्यासाठी, सरकारने आयकर भरणार्या महिलांच्या कुटुंबांचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून मागवला होता. हा डेटा मिळाल्याने अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांची छाननी होण्याची शक्यता होती. मात्र, आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका विचारात घेता, सरकारने ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित केली आहे. याचा अर्थ, या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावले उचलेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply