शेअर बाजारातील चर्चित प्रशिक्षणकर्ता अवधूत साठे आणि त्यांच्या ‘अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी’वर भांडवली बाजार नियामक सेबीने कठोर कारवाई केली आहे. साठे यांना तात्काळ प्रभावाने शेअर बाजारातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली असून, गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले तब्बल ६०१ कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सेबीने जारी केलेल्या १२५ पानी आदेशपत्रात संस्थेने कोणतीही कायदेशीर नोंदणी नसताना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना विशिष्ट समभाग खरेदी-विक्रीसंदर्भात टिप्स देणे, ‘हमीशीर कमाई’चे आश्वासन देणे आणि बाजार विश्लेषणाचे मार्गदर्शन करणे हे सर्व नियमबाह्य असल्याचे तपासात उघड झाले.
अकॅडमीने अंदाजे ३ लाख गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आणि निधी उभारला होता. या रकमेतून भांडवली बाजारात व्यवहार केल्याचा आरोप सेबीने नोंदवला आहे. प्रशिक्षणार्थींच्या पैशांचा बाजारात वापर करणे, तसेच त्यांना चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे या मुद्द्यांवरून सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
याशिवाय, साठे यांना त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्यासही मनाई करण्यात आली आहे. देशभरातील मुंबई, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे चालणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांवरही याचा परिणाम होणार आहे.
सेबीच्या या निर्णयामुळे साठे यांच्या अनुयायांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, बाजारातील प्रशिक्षण संस्था आणि स्वघोषित गुरूंवरील देखरेख आणखी कडक होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Leave a Reply