मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्यातील पत्रकार आता आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत. पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी ‘एसएमएस पाठवा आंदोलन’ करण्यात येणार असून या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो संदेश पाठवून पत्रकार आपला रोष व्यक्त करणार आहेत. या आंदोलनानंतर २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण होणार आहे.
महाराष्ट्रात २०१७ साली पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर ८ डिसेंबर २०१९ रोजी केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये हा कायदा प्रकाशित झाला. मात्र, राज्य सरकारकडून अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले नोटिफिकेशन अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे हा कायदा अजूनही प्रत्यक्षात लागू झाला नाही. पत्रकार संघटनांनी वारंवार मागणी करूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पत्रकार एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक, अमरावती, करमाळा, मुंबईसह अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले असून, आरोपींवर केवळ किरकोळ कारवाई झाल्याचे उदाहरणे आहेत. हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी ही अत्यावश्यक असल्याचे पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे.
पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई यूनियन ऑफ जर्नालिस्ट, पुणे पत्रकार प्रतिष्ठान, डिजिटल मिडिया परिषद, जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र आदी प्रमुख संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.
राज्यातील सर्व पत्रकारांनी ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आपल्या संतप्त भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाने केले आहे. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेऊन कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी पत्रकारांची अपेक्षा आहे.
Leave a Reply