भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुऱ्हाणनगर येथील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या भूमिकेतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गावचे सरपंच, आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा प्रभावी राजकीय प्रवास होता. त्यांनी सहा वेळा आमदारकी भूषवली. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष तर्फे त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.

कर्डीले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरून पहिली आमदारकी मिळवली होती. नंतर भाजपमधून त्यांनी ठसा उमटवला. दूध व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल उद्योगामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात सर्वदूर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

शिवाजीराव कर्डीले यांच्या जाण्याने नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुले व मोठा समर्थक वर्ग असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *