आज दिनांक २२ फेब्रुवारी !
तसं पाहिलं तर, ही आपल्या कॅलेंडरवरील एक तारीख. पण या दिवसाला महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्व आहे.
आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९६७ मध्ये, शरद पवार यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. तो हा महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्राच्या बाल्यावस्थे पासून सुरू झालेला शरदरावांच्या राजकीय जीवनाचा प्रवास, आता हीरकमहोत्सवाच्या दिशेने सुरू आहे… तरीही राज्याच्या राजकारणात शरद पवार, हे नाव वगळून कोणतीही निवडणूक होत नाही. येत्या राज्यसभा निवडणुकीत जरी पवार उभे राहणार नाहीत, असे त्यांनीच जाहीर केले असले, तरीही संभाव्य उमेदवार यादीत पवारांच्या नावाचीच चर्चा अधिक आहे…

योगायोगाने आजच्याच दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनाला ३४ वर्षांपूर्वी, २२ फेब्रुवारी १९९२ रोजी सुरुवात झाली. देवेंद्रजींच्या प्रचंड नाट्यमय घडामोडींनी भरलेला आणि महत्त्वाकांक्षेने भारलेला राजकीय प्रवास, आता सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या दिशेने मोठ्या तडफेने सुरु आहे.
विशेष म्हणजे, पवार आणि फडणवीस यांच्या वयात किंवा अनुभवात खुप मोठं अंतर असले तरी, गेल्या एक तपाहून जास्त काळासाठी, २०१४ पासून, राज्यातील राजकारणात, हेच दोन धुरंधर नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर तर, महाराष्ट्रातील शह-काटशहांच्या राजकारणाने कहर माजवला आहे. पण त्यातही खरे ‘युद्ध’
याच दोन नेत्यांमध्ये रंगलेले दिसतंय.

जागतिक शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे अवघं जग “रशिया” किंवा “अमेरिका” या दोन गटात विभागलेले दिसत असे. अगदी त्याच पद्धतीने, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असणारे पक्ष वा संघटना, स्वसंरक्षणासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी, फडणवीस किंवा पवार अशा गटात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील झालेले दिसतात. मुख्य म्हणजे, कितीही एकमेकांशी लढत असले तरी, आजच्या घडीला, पवार-फडणवीस यांच्या व्यतिरिक्त तिसरी राजकीय शक्ती महाराष्ट्रात अस्तित्वात येणार नाही. आलीच तर टिकणार नाही. याची काळजी, हे दोन दिग्गज नेहमीच घेताना दिसतात….आणि आपल्या मनाप्रमाणे सत्ताचक्राला फिरवतात. (जी बाब सामान्य कार्यकर्त्याच्या आकलना पलीकडील असते)

महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण राजकारणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, देवेंद्र फडणवीस आणि शरदचंद्र पवार यांच्या राजकीय जीवनात असंख्य चढउतार आलेले आपण पाहिलेत. पण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी त्यावर मात करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असलेलं पाहायला मिळतं. कोणत्याही परिस्थितीत, अगदी टोकाच्या टीकेची झोड उठली असताना किंवा राजकीय अस्तित्व धोक्यात आले असताना, पवार- फडणवीस लढतात. आपल्या मनाची शांती टिकवून, कामाचा उत्साह वाढवत आणि भविष्याचा अंदाज घेत, हे जिगरबाज नेते विजयश्री खेचून आणतात. म्हणूनच एवढ्या प्रदीर्घ काळापासून ते लोकांचे नेतृत्व करतात. राजकारणावर प्रभाव टाकतात.
देवेंद्रजी किंवा शरदराव यांच्या राजकीय भूमिकांविषयी, किंवा विशिष्ट धोरणात्मक निर्णयांबाबत, आपले मतभेद असु शकतात. पण या दोघां नेत्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचं जगणं सुखद आणि समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान कुणीच नाकारू शकणार नाही.

शेती, जलयुक्त शिवार , व्यापार, उद्योगधंदे, ग्राम स्वराज्य, शिक्षण, नगर विकास, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत या दोन्ही नेत्यांनी केलेली कामं, आखलेल्या योजना आणि घेतलेले निर्णय, महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर नेणारे ठरलेत. ही वस्तुस्थिती सुजाण लोक कधीच विसरणार नाहीत…
पक्ष वेगळे, तरीही लोकविकासाचे लक्ष्य एकच असणाऱ्या…
महाराष्ट्राचे मोठेपण वाढवणाऱ्या,
या दोन्ही नेत्यांना, Work_Anniversary साठी आणि
पुढील राजकीय वाटचालीसाठी, मन:पुर्वक शुभेच्छा !!!
महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply