उदे गं अंबे, उदे !!

नवरसाने नटलेल्या नित्यनूतन नवलाईचा, नवसृजनाचा, नवरात्रींचा उत्सव सुरू झाला आहे. आता हवेमध्ये धुपाचा गंध भिनत जाईल. घटस्थापनेनंतर हिरवा निसर्ग, लाल, केशरी, पिवळा होत, अवघ्या भूतलावर, फुलांच्या माळा गुंफत येईल आणि स्त्रीत्वाच्या परमोच्च आविष्काराचे, मातृत्वाच्या गौरवाचे शब्द-गीत चराचरात भिनत जातील… भक्ती आणि शक्तीच्या अविरत प्रवाहात अवघे भारतवर्ष न्हाऊन निघेल…
आपले सारे सण… हे असे निसर्ग केंद्रित… निसर्गाचं लेणं आपल्या हृदयात सामावून घेणारे आणि आपल्या आनंदाची निसर्गात उधळण करणारे… म्हणुनच, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे अनेकरंगी उत्सव कसे निर्माण झाले, याचा मागोवा घेत गेलो की, आपल्या पूर्वजांच्या विचारांची, परंपरेच्या सातत्याची अनुपम अपूर्वाई मनाला थक्क करून टाकते…..
नवनवोन्मेषशालिनी नवदुर्गेच्या नवरात्रीचं जागरण, उत्सव हा असाच स्त्री-पुरुष नात्याच्या नवरंगाची महती गाणारा, त्या नात्याला नवनवे अर्थ प्रदान करणारा आहे. त्यामुळे नवरात्रीत होणारी घटस्थापना, रात्री रंगणारे गरबानृत्य यामागील प्रेरणा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. साधारणत: कोणत्याही सण-उत्सव वा अन्य चालीरीतींचा अर्थ जाणून न घेता आपल्याकडे त्या चालीरीती जोरात साज-या करण्याचा प्रघात आहे. हल्ली गोपाळकाला, गणपती उत्सवापाठोपाठ नवरात्रसुद्धा एक ‘इव्हेंट’ झाला आहे. त्यामुळे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा विशेषत: मातृशक्तीचा उत्सव न राहता, बेधुंद आणि बेफाम नाच-गाण्यांचा जलसा बनला आहे. पूर्वी उत्सवात असणारा उत्साह आता अचकट-विचकट आविर्भावात प्रकट होताना दिसतो. कुळाचार-कुळधर्म यांच्या पारंपरिक विधीचे पालन घरातही होताना दिसत नाही. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सवात त्याचे पालन कुणी करावे, ही अपेक्षाही करवत नाही. थोडक्यात सांगायचे तर नवरात्रींच्या जल्लोषाला पारंपरिक वेशभूषा आणि रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्यासाठी वडिलधा-या मंडळींकडून ‘ऑफिशियल’ परवानगी या दोनच गोष्टींमुळे तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. तरुणाईच्या या उत्सवी उत्साहावर पाणी फिरवण्याची आमची अजिबात इच्छा नाही, परंतु या युवा पिढीतील मुला-मुलींना जर या उत्सवामागील अर्थ कळला तर त्यांच्या वर्तनात बराच फरक पडेल, अशी प्रांजळ अपेक्षा आहे….
आपल्याकडे नवरात्रीत जी घटस्थापना केली जाते, अष्टमीला घागरी फुंकत नाचण्याची प्रथा आहे. तर शेजारच्या
गुजरातेत नऊ रात्री घटामध्ये, मडक्यामध्ये दीप पेटवून त्याभोवती गरबा नृत्य केले जाते. ‘गरबा’ हा शब्द “गर्भ” शब्दाचा अपभ्रंश आहे. ओदिशा-बंगालमध्येही घटात विविध ठिकाणची माती टाकून धान्य पेरले जाते. या सगळ्या क्रियेमध्ये जो “घट” आहे, तो जीवनाचे प्रतीक आहे.
संत कबीर यांनी “घट घट मे पंच्छी डोलता” या अभंगात या घटाचे आणि मानवी जीवनाचे खुप छान वर्णन केले आहे…
हिंदू धर्मात माणूस मेल्यानंतर, अग्नि देताना, मडके फोडतात, कारण त्या माणसाचे आयुष्य संपले, याचे ती कृती निदर्शक असते. पती-पत्नी यांच्यात जेव्हा बेबनाव होतो, ते विभक्त होतात, त्यालाही ‘घटस्फोट’ म्हणतात. येथे हा शब्द त्या दोन्ही व्यक्तींचे “जगणे संपले” असे सूचित करतो. हल्लीच्या संदर्भात तो अर्थ लागू पडणार नाही, कारण दोन-तीन घटस्फोटानंतरही लग्नाची आस बाळगून असणारे अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात, सिनेमात वा बातम्यांमधून भेटत असतात, तो भाग अलाहिदा. तर हे घटाचे प्रतीक आपल्याकडे जसे जीवनासाठी वापरले जाते, तद्वत ते पृथ्वीसाठीही वापरतात. नवरात्रात शक्तीचा, बुद्धीचा, लक्ष्मीचा जागर मांडला जातो, परंतु देवीच्या या नऊ रूपांच्या जागरणात मातृशक्तींच्या जागराला विशेष महत्त्व आहे. विशेषत: ज्या काळामध्ये, वैदिकोत्तर काळात हा उत्सव सुरू झाला, त्यावेळी आपले पूर्वज शेती आणि पशुपालनात रमले होते, स्थिरावले होते. पाऊस संपल्यानंतर पेरलेल्या धान्याचे नवे दाणे येण्याचा कालखंड हा नवरात्री जागून साजरा करण्याची पद्धत पडली असावी. ‘नवधान्य’पूजन आणि धरतीचे सृजन नृत्य-गीताद्वारे साजरे करताना मातृशक्तीच्या उपकाराबद्दल तिची पूजा सुरू झाली. आपल्याकडे प्रत्येक देवीला आई म्हणतात, ते त्याचमुळे. यामध्ये स्त्री-पुरुष हा भाग नाही. तसे असते तर आमच्या पुराणात, गीतात शिवाला किंवा विष्णूला, रामाला वा कृष्णाला वडील, बाबा असे संबोधले गेले असते. मात्र तसे फार क्वचित आढळते. परंतु आई जगदंबा, रेणुका माऊली, मायभवानी तुळजाई अशा ‘आई’च्या संबोधनाने प्रत्येक देवीची आळवणी, स्तुती केली जाते, हे येथे लक्षात घेतले, तर आमच्याकडील मातृदेवतांची परंपरा समजणे सोपे जाईल. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकात पुण्याच्या परिसरातील बहुतांश मातृदेवतांच्या उगम आणि उत्कर्षाची कहाणी दिली आहे. ते लिहितात, बाणाच्या ‘कथा सरित्सागर’ आदी ग्रंथावरून मातृ-देवता पंथाची वाढती शक्ती दाखवणे ही साधी गोष्ट आहे. मला असे वाटते की, प्रत्यक्ष क्षेत्र संशोधनाने या विधीचा उलगडा जितका नीट होईल, तितका याने होणार नाही. मातृदेवता असंख्य आहेत, कित्येकींना नावदेखील नसून त्यांचा उल्लेख नेहमी गटानेच होतो. मावळातील ‘लहान आया’ किंवा सात आसरा (सप्त अप्सरा) यांचे अस्तित्व तळे, पाणवठ्याजवळ लाल रंगाने दर्शवलेले असते. मावळ प्रदेशात प्रत्येक गावात एक तरी मातृदेवता असतेच. अनेकदा या देवीला दुसरे काही नाव न देता फक्त ‘आई’च म्हणतात, असे कोसंबी यांनी अनेक वर्षाच्या संशोधनानंतर लिहिले आहे. थोडक्यात सांगायचे तर आज आम्ही ज्या देवीच्या विविध रूपांचे पूजन करतो, त्यांचे मूळ या आदिम, वैदिकपूर्व काळातील ग्रामदेवतांमध्ये आहे. शेती आणि पशुपालनाद्वारे स्थिर आयुष्य जगणा-या तत्कालीन समाजाला अन्न-धान्य, दूध-तूप आणि चारा-पाणी देण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त भूमीमध्ये होते. त्यामुळे भूमातेचे पूजन आणि पर्यायाने पृथ्वीच्या स्वरूपात स्त्रीचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली. अर्थात, त्याला स्त्रीमध्ये असणा-या गुणधर्मामुळे समाजमान्यता मिळाली असावी. पृथ्वीमध्ये जी धारण करण्याची, सहन करण्याची निसर्गदत्त शक्ती आहे, ती स्त्रीमध्ये असते. पृथ्वीमध्ये नवनिर्मितीचे, सृजनाचे सामर्थ्य आहे, हे स्त्रीमध्ये प्रजोत्पादनाच्या रूपाने प्रतित होते. उदरभरणाचे जे काम पृथ्वी फळ-धान्य देऊन करते, प्रत्येक घरातील स्त्री अगदी त्याला पूरक काम करीत असते. पृथ्वी हा जसा माणसांच्या जगण्याचा आधार आहे, तद्वत स्त्रीसुद्धा सुख-दु:खात, आयुष्याच्या सर्व टप्प्यांत पुरुषाचे ‘संगोपन’ करीत असते. भलेही तिचे रूप किंवा नाते कोणतेही असेल, ती पत्नी असेल, बहीण, मुलगी वा मैत्रीण असेल, प्रत्येक पुरुष तिच्यात आपली आई शोधत असतो. हा शोध अथक आणि अखंडपणे सुरू असतो. मातृशक्तीची पूजा सुरू होण्यास मातृसत्ताक कुटुंब पद्धतीच्या प्रभावासोबत तमाम पुरुषांच्या मनातील ही सुप्त इच्छा कारणीभूत असू शकते असे वाटते. एकूणच काय तर नवरात्री हा नवनिर्मितीचा, सृजनाचा उत्सव मानून त्यात मातृशक्तीची पूजा करण्याची आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा होती, परंतु गेल्या दोन दशकांत आलेल्या आधुनिकीकरणाच्या लाटेने या अनेक शतके सुरू असलेल्या परंपरेच्या ठिक-या उडवल्या आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आणि अर्थकारणाच्या नाड्या आहेत, अशा मंडळींकडे नवरात्र उत्सव गेल्यामुळे त्याला बाजारू स्वरूप आले आहे. नवरात्रोत्सवात भन्नाट संगीताच्या तालावर गरबा किंवा तत्सम नृत्य करणे, या गोष्टीला समाजमान्यता लाभल्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याचा जणू अधिकृत परवाना मिळतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरांत नवरात्रानंतरच्या काही आठवड्यांत गर्भपाताचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. ही बाब सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे काही पुढारलेल्या लोकांनी नवरात्र उत्सवात मुला-मुलींना ‘प्ले सेफ’ असे आवाहन करण्याची, एक नवीन पद्धत रूढ होताना दिसतेय. विविध माध्यमातून अल्पवयीन मुला-मुलींना लैंगिक संबंधाविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले जातेय. एका अर्थाने ते चांगले असले, तरी या अल्पवयीन मुला-मुलींच्या स्वैर वागण्याला त्यांचे पालकही तेवढेच जबाबदार असतात, तो भाग वेगळा. काळाचा महिमा तर पहा ना, एके काळी, मातृत्वाची, सृजनाची प्रेरणा देणा-या,
या घटस्थापना उत्सवाची अगदी खालच्या पातळीपर्यंत, म्हणजे “गरबा ते गर्भपात” अशी घसरण झाली आहे. ती रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा आपण मातृशक्तीलाच आवाहन केले पाहिजे.
‘उदे’ म्हणजे… ऊठ, जागी हो… आई … आदिशक्ती जगन्माते, सर्व विश्वाला जागे करत…जागी हो… ! आणि तुझ्या लेकरं बाळांचा सांभाळ कर… उदयोस्तू… आई..
उदे गं अंबे उदे !!!

महेश म्हात्रे
संपादक,
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *