आपण सारे मराठमोळे लोक जन्मापासून आणि मनापासून शिवप्रेमी. आपल्या ह्रदयात आणि आयुष्यात निरंतर *शिवाजी* या तीन अक्षरी मंत्राचा अखंड जयघोष होत असतो…
पण शिवाजी महाराज यांच्या भविष्यवेधी कार्याचे, लोकहितकारक कष्टांचे आणि अफाट कर्तृत्वाचे अनुकरण आम्ही कोणीही करत नाही…!
महापुरुषांचे विचार *डोक्यात* घेऊन पुढील पिढ्या घडवायच्या असतात. आम्ही मूर्त्या *डोक्यावर* घेऊन नाचण्यात धन्यता मानतो.
आणि म्हणून असेल कदाचित महाराष्ट्राच्या मातीत
देशाला, जगाला दिशा दाखवणारा नवा शिवाजी जन्मत नाही …!
*होय, उठसूठ छत्रपतींचे नाव घेणारे, छत्रपतींचे नाव लावणारे आणि छत्रपतींच्या नावावर जगणारे, तमाम राजकीय नेते सुद्धा याला अपवाद नाहीत. निवडणुकांच्या तोंडावर ज्यांच्या तोंडात महाराजांचे नावे येते, परंतु ज्यांची प्रत्यक्ष कृती महाराजांच्या विचारा विरोधात असते, असे राजकारणी महाराष्ट्र घडवू शकत नाहीत*. घडवणार ही नाहीत. कारण त्यांना पुढे न्यायचे असते आपले, कुटुंबकेंद्रीत राजकारण. ज्याला आमच्या शिवबा राजांनी कायम विरोध केला होता… आमच्या महाराजांनी सत्ता हे सेवेचे साधन मानले होते. पक्ष कोणताही असो, हल्लीच्या नेत्यांसाठी सत्ता हे स्वार्थाचे कुरण बनले आहे.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस संपत्तीचे विवरण सादर करताना आपल्या शपथपत्रात किती कोटी, किती घरे, बंगले वाढवता येतील, हाच या स्वार्थी राजकारण्यांचा एकमात्र “अजेंडा” असतो…
*म्हणून, मोठ्या चलाखीने, ते तुम्हा – आम्हाला अडकवतात, जातीपातीच्या अभिमानात, तरुणांना गुंतवतात गुंतागुंतीच्या राजकारणात….*
डोळे उघडून पहा, सध्याच्या सर्वच राजकीय पक्षांचे हे वर्तन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या, कार्यपद्धतीच्या विरोधात आहे. म्हणूनच तुम्हाआम्हाला खरे स्वराज्य, खरे सुराज्य लाभत नाही… कदाचित लाभणारही नाही.
परिणामी, गेल्या अर्धशतकापासून भीषण दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, बेफाट बेकारी गावखेड्यातील लोकांना देशोधडीला लावतेय…त्यांना शहरातील बजबजपुरीत ढकलतेय…
झोपडपट्ट्यांनी लदबदलेली मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारखी शहरे सगळयांचे जीवनरस शोषून एखाद्या जीवघेण्या अजस्त्र ट्यूमरसारखे फोफावताहेत..
शिवाय निसर्गही कोपलाय. कधी नव्हे एवढा, ऊन्हाळा असह्य होतोय, पावसाळ्यात कधी काय होईल याचा नेम नाही… वरुण राजाने थोडासा पाऊस जरी शिंपडला, तरी इथले रस्ते तुंबतात. कारण भ्रष्टाचारामुळे अवघी व्यवस्थाच गोठून गेलेली आहे. त्यासोबत गोरगरीब घरातून आलेल्या नोकरशाहीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावनाही गेल्या आहेत थिजून… सरकारी नोकरी ही “वरकमाई” करण्याचे अधिकृत माध्यम बनलेली आहे. सामान्य जनतेला भरडून टाकणाऱ्या या नोकरशहांच्या विरुद्ध एकही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना बोलताना दिसत नाही. यावरून अवघा समाज “थंड नव्हे षंढ करणारी” त्यांची ताकद लक्षात येते.
आजकाल थंडी कधीही पडू शकते. शहरातील लोक या थंडीचे चहा, भजी खात, रुचकर पेय पित , जेव्हा कौतुक करत असतात, तेव्हा तिच थंडी, शेती, फळबागांचे अतोनात नुकसान करून जाते… आमच्या सरकारांच्या डोळ्या देखत. मग उपकार म्हणून, कॅमेऱ्याच्या प्रकाश झोतात फेकल्या जातात हजार बाराशे रुपयाच्या रेवड्या शेतकऱ्याच्या दुर्बळ हातात.
*एकुण काय तर… सगळं ॠतुचक्र बिघडलंय, सोबत तुटून पडले आहे, राजचक्र…*
एक साधं उदाहरण पहा ना, भारत चंद्रावर जाण्याची स्वप्न पाहतोय, पण साधे हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे हवामान खाते गेल्या ७५ वर्षात आमच्याकडे तयार झालेले नाही.
*एकेकाळी “शिष्टाचार” मानला जाणारा, छुप्या पद्धतीने चालणारा “भ्रष्टाचार” आता, गल्लीपासून दिल्लीपर्यंत उघडपणे सुरू असणारा, निमुटपणे सहन करण्याचा “अत्याचार” बनलाय.*
एकूणच काय तर, “सत्ताचक्र” चालवणाऱ्यांमध्ये स्वार्थी लोकांचे बहुमत झाले आहे… त्यामुळे विस्कटून गेलंय सामान्य माणसाचं , तुमचं- माझं जीवनचक्र…
शिवाजीराजे जन्माला येण्याआधी महाराष्ट्रात अशीच भीषण अवस्था झाली होती. मोंगलांच्या आक्रमणाने, परचक्राच्या वरवंट्याखाली अवघा समाज भरडून, चिरडून गेला होता.
स्वतःच्या मनगटाच्या बळावर पराक्रम करायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधत आयुष्य चैनीत घालवायचे. असा त्यावेळेसच्या पराक्रमी, सरदार, सुभेदार नेत्यांचा निश्चय होता. त्यामुळे सामान्य लोकांना वाली उरला नव्हता.
… तेव्हा, त्या प्रतिकूल काळात, हाती विशेष काही साधनसामुग्री नसताना लोकहितदक्ष जिजाऊ माऊली, शहाजी राजे आणि सोळा वर्षांच्या, शिवबा राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते पुर्ण करण्यासाठी अवघं आयुष्य पणाला लावलं. जगात सर्वात बलवान राजा म्हणून ओळखला जाणारा औरंगजेबासारखा शत्रू आणि त्याची जुलमी राजवट मोडून काढली. रयतेच्या गवताच्या पात्यापासून, लेकीबाळींच्या ईभ्रतीपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा आईच्या मायेने आणि बापाच्या समर्थ बाण्याने विचार करून शिवाजी राजे राज्य करत होते…ते सारं, सारं महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे लोक विसरलेत, म्हणून महाराष्ट्राला अनंत समस्यांनी ग्रासलेले दिसतेय. पण, जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर, सर्वसामान्य मराठी लोकांना कधीच छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांच्या लोकोत्तर कार्याचे विस्मरण होणार नाही… कारण आजही छत्रपती *”शिवाजी महाराज की जय”* ही घोषणा आमच्या हृदयात चैतन्य आणि अंगावर रोमांच उभे करते.
मित्रहो,
आज आपण सारे *शिवजयंती* निमित्ताने, छत्रपती शिवाजी शिवाजी राजे यांच्या पराक्रमाचे स्मरण करत आहोत, समाज माध्यमांवर व्यक्त होत आहोत… पण हे सारं करताना आपण सारे आपल्या लाडक्या राजाचं थोडंफार अनुकरण करण्याचा,*”स्व” पेक्षा “स्वराज्याला” महत्त्व देण्याचा निर्धार करूया.* आपल्या क्षमतेनुसार अवतीभवतीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू या… निसर्गाचे आणि निराधारांचे रक्षण करूया…
फक्त शासन व्यवस्थेला दोष नदेता, भगवा ध्वज खांद्यावर घेऊन, स्वतःपासून सुरुवात करूया… महाराष्ट्रदेशी… अवघ्या भारत वर्षात, पुन्हा एकदा स्वराज्याचे, सुराज्याचे तोरण बांधू या… छत्रपतींचा जयजयकार करूया !
सर्व मावळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


Leave a Reply