धवल शरद ऋतू काळोखाच्या आभाळावर प्रसन्न झाल्यावर चांदणनक्षी बहरावी, चराचराला उजळीत तो सारा चांदणचुरा अंतरीचा गाभारा सुखकारक करीत असतांना मन अचंबित करणारा गडगडाट व्हावा…चांदण्यांनी भरलेले आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी आक्रमिले जावे, आणि जिथे चांदणे सांडले होते तेथे चिखल माती ओघळावी, अगदी तशीच स्थिती शरदच्या अकाली मृत्यूच्या बातमीने झाली.
शरद हरिश्चंद्र आंबवणे , माझा जवळपास पस्तीस वर्षांहून अधिककाळचा मित्र…आपल्या अंगभूत गुणवत्तेच्या् बळावर केमिकल ईंजिनीयरींग पूर्ण करणारा. दिल,दोस्ती, दुनियादारी असे जवळपास सगळेचं चढउतार आम्ही एकत्र पाहिले, काही एकत्र अनुभवले. अगदी वयाच्या पन्नाशीपर्यत, पण शरदच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्याचा उतार एवढा तीव्र असेल की त्यामुळे तो आपल्या खूप, खूप पुढे जाईल याचा मला कधीच अंदाज आला नव्हता.
26 नोव्हेंबरला रात्री त्याचा फोन आला. जवळपास आठ-नऊ महिन्यांनी त्याचा आवाज ऐकत होतो. त्याआधी तो रुग्णालयात दाखल आहे ,एवढीचं त्याची खबरबात मिळत होती. त्यामुळे थोड्या जोशातच मी त्याला विचारलं, “काय रे कुठे गायब होता”, त्यावर थोडं थांबून तो बोलू लागला आणि बोलता बोलता त्याचा भावनांचा बांध फुटला. मी एवढी वर्षं पाहिलेला भावूक आणि खंबीर, सरळ पण कर्तव्यकठोर शरद असा नव्हता. त्यामुळे मी थोडा दचकलो, मनातून भेदरलो, मी मुंबईबाहेर आहे हे लक्षात येताच उद्या फोन करतो असे सांगून त्याने फोन ठेवला.
पुन्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी शरदचे फोन येत गेले , काही वेळा मी फोन करायचो, आपल्या जगण्याचे ताणे-बाणे तो माझ्यासमोर मोकळेपणाने उलगडत गेला. मी त्याला दिलासा देण्यासाठी समजूत घालायचा प्रयत्न करायचो.
“आपल्या दोघांमध्ये कधीही आडपडदा ठेवला नाही. मग मला बोलू दे,” असं सांगत तो मोकळा होत होता.
प्रत्यक्ष भेटीची तीव्र इच्छा दोघांनाही तेवढ्याच असोशीने लागलेली होती, पण ती अपूर्ण राहिली, कायमची….
शरद, माझा फक्त मित्र नव्हता, तो अगदी सच्चा हितचिंतक होता. माझ्या यशाचा अभिमान बाळगणारा खरा साथीदार होता. गेली अनेक वर्षं दर रविवारी त्यांचा मला फोन येत असे, कधी वाचलेल्या लेखाचा किंवा चॅनलवरील कार्यक्रमाचा संदर्भ देऊन गप्पा सुरू व्हायच्या आणि अल्पवधीतच रंगायच्या. मग घरातील सगळ्यांची विचारपूस आणि रविवारच्या कार्यक्रमाची चौकशी व्हायची, आता हे सारे थांबले आहे. उद्याचा, पुढील प्रत्येक रविवार शरदच्या फोन शिवाय सुनासुना जाणार आहे. ही कल्पनाच असह्य वाटते….
शरद आणि मी खरे जवळ आलो 1982-83 पासून…अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर, वाड्याच्या पी.जे. हायस्कुलमध्ये रोजच्या भेटी सुरू झाल्या. अभ्यासात हुशार असणार शरद दिसायला जितका छान तेवढाच नृत्यातही प्रवीण. त्याकाळात जितेंद्रच्या सिनेमांनी तरुण पिढीवर गारूड केले होते. शरद त्याचा चाहता बनला होता. मग काय गॅदरिंगला दरवर्षी शरदचा डान्स आणि त्याला अफाट गर्दी हे जणू समिकरणचं बनून गेले होते. त्या काळात शरदसोबत फिरायला मला खूप मस्त वाटत असे. त्याचे सुंदर दिसणे, फॅशनेबल कपडे, सुंगंधी अत्तरांची हौस हे सगळं असूनही शिक्षणातील हुशारी, त्या सगळ्यासोबत जिवाला लळा लावणारा गोड स्वभाव…शरदच्या या सगळ्या गुणांचा हेवा आणि अभिमान वाटायचा. मध्यंतरी पाच-सहा वेळा तो घरी आला होता. माझ्यापेक्षा जास्त गप्पा अथर्वशी मारण्यात त्याला मजा वाटायची. अगदी पहिल्या भेटीपासून त्या दोघांचे सूत एवढे जमले की, बऱ्याच वेळा मी फोन उचलला नाही तर शरद अथर्वला फोन करत असे. शरद सारखे निर्मळ आणि लाघवी वागणे असणारे फार थोडे लोक आपल्याला भेटतात. आमचा शरद तसा होता. लहानपणीच्या गोष्टीत एखादा शापित राजपुत्र असायचा ना अगदी तसाच सारं काही चांगलं असताना कुठल्या तरी कारणाने नियतीच्या रोषाला बळी पडलेला….
वाड्यातील शाळेत शिकून पुढे इंजिनिअर झालेल्या शरदला खरंतर सिनेमात जायचे होते. ठाण्यात शिकताना त्याने काही मालिकांसाठी, सिनेमांसाठी चांगले प्रयत्नही केले होते. पण अफाट स्पर्धेच्या क्षेत्रात त्याला शिरकाव करता आला नाही. पुढे धंदा-व्यवसाय करत त्याने मुसंडी मारली. त्यावेळी आपल्या या सिनेमाच्या आवडीची तोच थट्टा करीत असे. पण ते काहीही असो, त्याच्या आयुष्याला लाभलेली हिरोपणाची झळाळी मात्र त्याने कायम जपली होती. आयुष्य आनंदाने जगावं, हा मूलमंत्र उराशी बाळगणारा शरद, कैलास टाॅकिजच्या बाहेर बसणार्या मधु मावशाच्या हातचे गुलगुले भजी असो, तरेंची वा मामलेदाराची मिसळ जितक्या चवीने खायचा तेवढ्याच रुबाबात पंचतारांकित हाॅटेलात वावरायचा. त्याचे हेच सहजपणाचे वागणे, प्रेमळ बोलणे आमच्यासाठी शरदाचे चांदणे होते…
वाड्यात, ठाण्यात राहतांना आम्ही चार मित्र सकाळ-संध्याकाळ भेटायचो पायाला भिंगरी लागल्यागत फिरायचो. हसायचो, छोट्या, छोट्या आनंदात रमून जायचो. खिशात पैसा नसायचा, पण जगण्याची रूपेरी स्वप्ने पहात बिनधास्त जगायचो. तात्या, संतोष, शरद आणि मी अशी आमची चौकडी अनेक वर्ष एकत्र राहिली. आयुष्याचा मोठा टप्पा पार होत असताना, आता शरदच्या जाण्याने त्यातील एक महत्त्वाची कडी निखळलीय… पण आठवणींचा दुवा मात्र आमच्यासोबत आहे…आयुष्यभर !
ते स्मृतींचे चांदणे हृदयाशी जपणे
हीच शरदला वाहिलेली श्रद्धांजली !
महेश म्हात्रे
संपादक- संचालक


Leave a Reply