सावधान! “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…

“खारे वारे (Sea Breezes) म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे आणि मतलई वारे (Land Breezes) म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे असतात…
पण, आता काहीतरी आक्रित घडतंय…
कसेही कुठून जाणारे… आपल्यासोबत काहीही वाहून नेणारे, “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…
थाटामाठ बारामती नगरातील पवार कुटुंबियांनी एकत्रितपणे धन-कुबेर “अडाणी कथेचे” कृत्रिम-प्रज्ञादायक पारायण सुरू केल्याने, प्रजा गोंधळून गेलेय… कारण, जाणत्या नेत्याच्याच पुढाकाराने, शेतकरी- कष्टकरी जनतेच्या नेत्यांच्या घरात मात्र, धनसाधनेचे “मतलबी वारे” वाहू लागले आहेत…

कालपर्यंत मोदी राजवट उलथून टाकण्याचे असंख्य प्रयत्न करणार्‍या साक्षात शरद पवार यांनी, बारामती क्षेत्री, आपल्या भाविक भक्तजनां समोर “अडाणी स्तोत्र” इतक्या जोरात म्हंटलं की, ते ऐकून, चातुर्यभामिनी सुप्रिया ताई, आपोआप “अडाणी भावाने” डाणी, दाणी..अडाणी… असा जप करू लागल्या… त्या समाधी अवस्थेतून बाहेर येता येता, त्या वदल्या, “गौतम भाई अडाणी माझ्या मोठ्या भावासारखे”मग, खरे मोठे भाऊ अजित दादा, थोडे नाराजीने का, असेना, अडाणी भाईचे स्वागत करते झाले…”
बारामतीत घडलेला, गौतम अदानी यांच्या स्वागताचा हा प्रसंग, महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांची
एक रंजक झलक आहे…

बारामतीमध्ये येताच, अडाणी दाम्पत्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्साहाने केलेलं स्वागत, एकाच गाडीतून केलेला प्रवास आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ, या सगळ्या बाबी, बदलत्या काळानुसार बदलत्या स्थितीची “प्रतीकात्मक” रूपे आहेत.
शरद पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’साठी गौतम अदानी यांनी उघडपणे दिलेला निधी, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खासगी भांडवलाच्या वाढत्या सहभागाचं उदाहरण आहे.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही भविष्यातील गरज आहे, हे निर्विवाद असलं तरी, उद्योगपती आणि राजकीय सत्ताकेंद्र यांच्यातील जवळीक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या प्रतीकात्मक ठिकाणी हा कार्यक्रम होणं, त्याला अधिक महत्त्व प्राप्त करून देतं. अजित पवार यांचं अदानींना दिलेलं ‘गौतमभाईSSS वेलकम’ हे संबोधन केवळ व्यक्तिगत आपुलकी दर्शवत नाही, तर सत्ताधारी राजकारण आणि मोठ्या उद्योगसमूहांमधील सुसंवादाचं संकेत दर्शवते. एकीकडे विरोधकांकडून अदानी समूहावर टीका होत असताना, दुसरीकडे राज्याच्या सत्ताकेंद्रात बसलेले नेते, त्यांचं खुलेआम समर्थन करताना दिसतात. यामुळेच हा प्रसंग राजकीय, सामाजिक वर्तुळात चर्चेचा ठरणे, साहजिकच आहे.
शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण विकासासाठी मोठा निधी मिळणं स्वागतार्ह आहे. मात्र, अशा भागीदारीत पारदर्शकता, सार्वजनिक हित आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकून राहणं, तितकंच महत्त्वाचं आहे. अदानींच्या भाषणात इतिहास रचणाऱ्या मेहनती लोकांचा उल्लेख असला, तरी लोकशाहीत इतिहास फक्त मेहनतीने नव्हे, तर जबाबदारीनेही रचला जातो. हे विसरून चालणार नाही.

थोडक्यात काय तर, प्रगतीसाठी ओळखली जाणारी पंचवीस मैलांची बारामती, पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञानाचे, मौल्यवान प्रतीक ठरली आहे, या वेळी केवळ पवार कुटुंबाच्या राजकारणाची नव्हे, तर उद्योग, तंत्रज्ञान आणि सत्तेच्या “नव्या युतीची’ ती वाहक बनली आहे…
आता, प्रश्न इतकाच आहे, या युतीचा खरा लाभ कोणाला आणि कितपत मिळणार?
पवार कुटुंबियांना की शेतकरी, कष्टकरी घरातील मुलांमुलींना ?

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *