मराठा साम्राज्याची पताका अटकेपार फडकवणारे रणधुरंधर पेशवा बाजीराव ज्यांच्या काळात मराठ्यांची सत्ता जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर होती…मोठमोठी सरदार घराणी यांच दरम्यान उदयास आली… असे महापराक्रमी पेशवे बाजीराव यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन ! थोरले बाजीराव पेशवे हे सुमारे सहा फूट उंच, भक्कम आणि पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या तेजस्वी कांतीमुळे आणि तांबुस गौरवर्णामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत मोहक वाटे. निकोप प्रकृती, मोहक चेहरा आणि अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहण्याचा स्वभाव यामुळे त्यांची छाप कोणावरही सहज उमटत असे. बाजीरावांना भपकेबाज पोशाखाचा तिटकारा होता. ते प्रामुख्याने पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या साध्या वेशात असत. त्या काळात जेव्हा राजेशाही वर्तन अगदी स्थानिक पातळीपर्यंत पोहचले होते, श्रीमंत, स्वतःची कामे स्वतः करताना दिसत . त्यांच्या आवडीचे चार घोडे होते, त्यांना त्यांनी नावे दिली होती, निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. विशेष म्हणजे, या घोड्यांची देखभालही ते स्वतः करत. त्यांच्या दाणा-पाण्याचीही दक्षता स्वतः घेणाऱ्या बाजीरावांचे हे प्रेमळ तरीही शिस्तबद्ध जीवन त्यांच्या नेतृत्वगुणांचे द्योतक होते.
खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. सारं सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. उण्यापुर्यां ४० वर्षांच्या आयुष्यात थोरले बाजीराव यांनी अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. मृत्यूने गाठेपर्यंत २० वर्षात त्यांनी ३६ मोठ्ठ्या लढाया केल्या. आणि सगळ्याच्या सगळ्या जिंकल्या.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्यपूर्ण आणि कुशल नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून विस्तारले नाही, तर त्यात संघ राज्यात्मक रचनेची देखील महत्त्वपूर्ण उभारणी करण्यात आली. यामध्ये जुने सरदार आणि प्रांत अधिकारी बदलून नव्या दमाचे तडफदार सेनानी साम्राज्यात दाखल केले गेले. तयार, प्रगल्भ आणि सक्षम नेतृत्व असलेल्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या नेमून दिल्या.बाजीराव पेशवे यांच्या काळात शिंदे, होळकर, पवार, जाधव, फाळके, पटवर्धन यांसारख्या नामांकित आणि कुशल नेतृत्वाच्या लोकांना साम्राज्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यामुळे मराठा साम्राज्याने एक नवा, शक्तिशाली आणि एकजुट असलेला पाया तयार केला. जो पुढील सत्तर ऐंशी वर्षापर्यंत मराठी साम्राज्याचा डोलारा सांभाळू शकला. तो मजबूत पाया होता, म्हणून पानिपतच्या लढाईत दारुण पराभव होऊनही मराठे अवघ्या दहा वर्षात पुन्हा दिल्लीचे सूत्रधार बनले होते.
मध्य प्रदेशच्या खरगोण जिल्ह्यामधील रावेरखेड या छोट्याशा गावात आमच्या श्रीमंत थोरले बाजीरावांची समाधी आहे. मध्यंतरी या परिसरात फिरत असताना, नर्मदेच्या किनारी चिरविश्रांती घेत असलेल्या आपल्या महापराक्रमी बाजीरावांना अभिवादन करण्याची संधी मिळाली होती. ती नीरव शांततेने भरलेली आणि श्रीमंतांच्या स्मृतींनी भारलेली संध्याकाळ आयुष्यभर स्मरणात राहील.
नर्मदेचे शांत निवांत पात्र , शेजारच्या पिंपळाची सळसळ आणि पराक्रमाची साक्ष देणारी समाधी !
मन नकळत भूतकाळात रमले . तत्कालीन तीन चतुर्थांश भारताचे नेतृत्व करणाऱ्या थोरले बाजीरावांची छबी आठवून मन भरून आणि भारावून गेले होते … तव स्मरण स्फूर्तिदायी ठरो !
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply