महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार पत्रकारांचे नेतृत्व करणारे एस.एम.देशमुख म्हणजे, उत्साहाचा अखंड धबधबा. सतत कार्यमग्न राहणारे एस.एम. हे गावोगावी विखुरलेल्या पत्रकारांच्या सुखदुःखात सामील होणारे खंबीर कुटुंबप्रमुख आहेत.
पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि समाजाच्या हितासाठी अखंड राबणारे एस एम सर दीर्घायुषी होवोत या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
“पत्रकारांनी सामााजिक जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं, केवळ घडलेल्या घटनांचे वृत्तांत देणं एवढंच पत्रकारांचं काम नाही, तर लोकांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अन्याय,अत्याचार याविरोधात आवाज उठविणे आणि प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील पत्रकारांनी पार पाडली पाहिजे.” या सामाजिक बांधिलकीतून एस एम देशमुख, गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहेत…आणि आपल्यासोबत असंख्य कर्तबगार तरुणांना कार्यप्रवण करीत आहेत. ही गोष्ट उज्वल परंपरा असलेल्या मराठी पत्रकारिता आणि महाराष्ट्रासाठी खुप आशादायक आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून देणे ही अवघड आणि प्रदीर्घ लढाई होती. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तो लढा यशस्वी केला. त्यासाठी एस.एम.देशमुख यांचे नाव भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात कायम घेतले जाईल.
एस.एम. यांनी केवळ पत्रकारांच्या प्रश्नांसाठीच लढे उभारले असं नाही, तर जनसामांन्यांच्या प्रश्नांसाठी देखील त्यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. त्यावर राजकारण्यांकडून टीका झाली. पत्रकार बांधवांकडून टिंगल झाली, पण एस एम आणि त्यांची टीम कशालाही बधली नाही, थांबली नाही. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेपर्यंत त्याचा निष्ठेने पाठपुरावा करण्याचा एसेम यांचा स्वभावधर्म आहे. त्यामुळेच असेल कदाचित त्यांनी हाती घेतलेले बहुतेक सर्व प्रश्न मार्गी लागतात.
पण कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा असा, मुंबई-गोवा मार्गाचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही, याची बोच कायम एसएम सरांच्या बोलण्यातून जाणवते.
तसे पाहिले तर एस एम हे बीडचे, म्हणजे मराठवाड्याचे. पण अलिबागमध्ये कृषिवल दैनिकाचे संपादक म्हणून आल्यानंतर, कोकणी माणसाच्या प्रश्नांवर त्यांनी केलेलं काम अभूतपूर्व आहे. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी त्यांनी सातत्यानं सहा वर्षे संघर्ष केला,सेझ विरोधी लढयातही घेतलेला सहभाग आणि कोकणातील स्थानिक भुमीपुत्रांच्या हक्कासाठी एकदा नव्हे अनेकदा त्यांच्या लेखणीमधून निघालेले “आंदोलनास्त्र” भल्याभल्याना जेरीस आणणारे होते. कारण पत्रकारांनी सामाजिक जाणिवा जपत काम केले पाहिजे, हे ते फक्त सांगत नाहीत तर त्यानुसार काम करत असतात.
कोरोना काळात त्यांनी केलेलं अफाट काम मी जवळून पाहिले आहे. कोविडच्या साथीत माणुसकी हरपली होती असे म्हणतात, पण त्या कठीण काळात त्यांनी असंख्य पत्रकार बांधवांना, त्यांच्या कुटुबियांना धीर, दिलासा दिलाच पण भरभक्कम आर्थिक आधारही मिळवून दिला. भारतातील खरेतर जगातील कोणत्याही पत्रकार संघटनेने केले नसेल, एव्हढे मोठे काम कोविड साथी दरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झाले होते. कोविड साथी दरम्यान आणि कोविड नंतर असंख्य पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. त्या विरोधात व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी एस एम सरांनी कायमच आक्रमक भूमिका घेतली. आजही त्यांच्या दिवसाची सुरुवात पत्रकारांच्या फोनने होते आणि सबंध दिवस तशाच पत्रकार संबंधित कामात जातो.
मनमिळावू अर्धांगिनी शोभना वहिनी आणि साता समुद्रापार जाऊन यशस्वी होणाऱ्या कर्तबगार मुले – सूना – नातवंडांच्या कुटुंबात एस एम रमलेले असतात. पण त्यापेक्षा जास्त त्यांचे मन गुंतलेले असते, गावखेड्यात पसरलेल्या हजारो पत्रकार बांधवांमध्ये. या असंख्य पत्रकार मित्रांना ते नावाने ओळखतात, शिवाय त्यांच्या कुटुंबियांशी देखील एस एम सरांचा वडीलकीच्या नात्याने संपर्क असतो. आजच्या स्व केंद्रित जगात असे निर्मळ मनाचे “सार्वजनिक व्यक्तिमत्व” पाहायला मिळणे अवघड. त्यांचा माझ्याशी, माझ्या परिवाराशी निकटचा स्नेह आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
एस एम सरांना आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो ही शुभकामना !
– महेश म्हात्रे
Leave a Reply