मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणीदरम्यान मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. संशयित सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी दावा केला आहे की, माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे तोंडी आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही. या धक्कादायक खुलाशामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केला, मात्र नंतर तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) वर्ग करण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, वकील रणजित सांगळे यांनी न्यायालयात माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या जबाबाचा उल्लेख करत धक्कादायक माहिती समोर आणली.
सांगळे यांनी दावा केला की, माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी मेहबूब मुजावर यांना मोहन भागवत यांना अटक करण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंग यांनी मुजावर यांना नागपूरला जाऊन भागवत यांना ताब्यात घेण्याचे आणि मुंबईत आणण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हा आदेश फक्त तोंडी असल्याने आणि कोणतेही लेखी प्रमाण नसल्याने मुजावर यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी, त्यांना सोलापुरातील एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, असा आरोप सांगळे यांनी केला आहे.
वकील सांगळे यांनी युक्तिवादात आरोप केला की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर चुकीच्या दिशेने वळवण्यात आला आणि ‘हिंदू दहशतवाद’ असे कथानक रचण्यात आले.
त्यांनी नमूद केले की, या प्रकरणातील संशयित संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा हे एटीएसच्या ताब्यात असतानाच मृत्यू पावल्याचा दावा माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी यापूर्वीच केला होता. मात्र, एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात हे दोघे जिवंत असल्याचे दाखवण्यात आले असून, अद्याप ते ‘वाँटेड’ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नवीन खुलाशानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास, त्यातील आरोप, तसेच तपास यंत्रणांची भूमिका यावर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्यावर यापूर्वीही विविध आरोप झाले होते, मात्र आता मोहन भागवत यांच्या अटकेसंदर्भातील दाव्यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, पुढील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply