वरळी येथे डॉ. गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपास होता. मात्र गौरीच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद ठरवत हत्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा संशय व्यक्त केला. त्याअनुषंगाने अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करून रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी रविवारी वरळी पोलीस ठाण्यात भेट देत मोठे आरोप केले. दमानिया म्हणाल्या की, “सकाळी आठ वाजता गौरीच्या कुटुंबीयांचा मला फोन आला. वरळी ठाण्यात पोहोचल्यावर आई-वडील प्रचंड व्यथित अवस्थेत होते. पहिला फोन जावयाने म्हणजेच अनंत गर्जेने केला आणि ‘तुमची मुलगी आत्महत्या करत आहे’ असे सांगितले. पाच मिनिटांतच दुसरा फोन येऊन ‘ती मयत झाली’ असे सांगण्यात आले. संपूर्ण घटनेत मोठा संशय आहे.”
दमानियांनी गौरीवरील मारहाणीचे आरोपही पुढे आणले. “गौरीच्या मैत्रिणी म्हणाल्या की तिच्या चेहऱ्यावर नेहमीच मार्क असायचे. अनंतचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते आणि गर्भपाताच्या फॉर्मवर त्याचे नाव पती म्हणून लिहिले होते, यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचे,” असा दावा त्यांनी केला.
सर्वात गंभीर आरोप करत दमानिया म्हणाल्या की, “वरळी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करताना बीड येथील एका व्यक्तीने ‘एक माणूस द्या, सेटलमेंट करू’ असे सांगितल्याचे मला कळले. सीनियर पीआयच्या केबिनमध्येही अशा सेटलमेंटचे प्रयत्न झाले.”
या पार्श्वभूमीवर दमानियांनी सकाळी ६ पासूनचे वरळी पोलीस ठाण्याचे CCTV फुटेज तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली असून “या फुटेजमधून कोण कोण पीआयच्या केबिनमध्ये गेले हे स्पष्ट होईल,” असे त्यांनी म्हटले. प्रकरणाचा तपास आता अधिकच गडद होत आहे.


Leave a Reply