तीव्र उष्णता आणि कीटकांचा भाजीपाल्यांवर मोठा परिणाम; उत्पादन घटले

देशभरात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा आणि पिकांवर हल्ला करणाऱ्या मावा कीटकांच्या प्रचंड प्रादुर्भावाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे लवकरच भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशा तीव्र उष्णतेमुळे भाजीपाला पिके जळून जात आहेत, तर दुसरीकडे मावा नावाच्या कीटकांनी या पिकांवर आक्रमण करून त्यांचे उत्पादन घटवले आहे. हे कीटक पिकातील रस शोषतात आणि रोगजनक विषाणू पसरवतात, ज्यामुळे पिके अधिकच नष्ट होतात.

व्हेजिटेबल ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी सांगितले की, “सध्याच्या हवामानामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांना मोठा फटका बसला आहे. उष्णतेमुळे झाडांचे पेशी कमजोर होतात, त्यात कीटकांचा हल्ला झाल्याने संपूर्ण पीक व्यवस्थाच कोलमडली आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की यावर्षी उत्पादनावर झालेला परिणाम मागील काही वर्षांपेक्षा जास्त गंभीर आहे. टोमॅटो, काकडी, वांगी, सोयाबीन यासारख्या रोजच्या वापरातील भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी झांबुवंत घोडके यांनी सांगितले की, “उष्णतेमुळे काही विशिष्ट कीटक अधिक प्रमाणात वाढतात. यामुळे फळे झाडांवरून अकाली गळतात. उरलेले फळही निकृष्ट प्रतीचे असते.”त्यांनी सांगितले की त्यांच्या शेतीतील उत्पादन जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाले असून उघड्यावर असलेल्या फळांना थेट सूर्यप्रकाशाचा फटका बसल्याने ती जळून खराब होत आहेत. पिकांचे उत्पादन घटल्याने बाजारात भाजीपाल्याचा पुरवठा कमी होणार आहे. परिणामी भाव वाढण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांनी नागरिकांनी भाववाढीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *