पिंपरी-चिंचवड : “सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे,” अशी चर्चा असली तरी “सगळे म्हणजे कोण?” असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात भाजपसोबत गेलेल्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पवार म्हणाले, “गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत.”
शरद पवारांच्या या थेट आणि स्पष्टवक्तव्याने अजित पवार गटाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून वारंवार एकत्रीकरणाच्या शक्यतांवर चर्चा सुरू असते, परंतु शरद पवारांच्या आजच्या वक्तव्याने या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.
या वक्तव्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्पष्ट केली असून, भाजपसोबत राजकीय संबंध ठेवणे हे पक्षाच्या मूळ तत्वांच्या विरोधात असल्याचे अधोरेखित केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करत असताना, शरद पवारांनी भाजपसोबतच्या संबंधांना ‘संधीसाधूपणा’ संबोधल्याने भविष्यात दोन्ही गटांमधील दरी आणखी रुंदावेल असे दिसत आहे.
Leave a Reply