पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेकाप नेते जयंत पाटील दोषी; हर्षद कशाळकर यांना न्याय

अलिबागहून पत्रकारांना प्रेरणा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा निकाल समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांना 2019 मध्ये लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मतदान केंद्रात मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.

घटनेच्या वेळी पाटील यांनी “तुम्ही पत्रकार काहीही छापता” असं म्हणत कशाळकर यांच्या कानशिलात लगावली होती. विशेष म्हणजे कशाळकर यांनी पाटील यांच्या विरोधात कोणतीही बातमी छापलेली नव्हती. द्वेषातून आणि राजकीय अहंकारातून ही मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं.

स्थानिक पातळीवर शेकापचं प्राबल्य आणि पाटील कुटुंबाची दहशत असतानाही पत्रकार हर्षद कशाळकर यांनी पोलिसात धाडसाने तक्रार दाखल केली. तब्बल सहा वर्षांच्या न्यायलढाईनंतर अखेर न्यायालयाने जयंत पाटील यांना दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून देण्याचे आदेश दिले. तसेच पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई कशाळकर यांना देण्याचाही आदेश कोर्टाने दिला.

या खटल्यात रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी एकजूट दाखवत कशाळकर यांच्या बाजूने उभं राहण्याचं धाडस केलं. अनेक पत्रकारांनी साक्षीदार म्हणून न्यायालयात उभं राहत हल्ल्याची सत्य परिस्थिती सांगितली. दबाव, आमिषं असूनही एकही साक्षीदार मागे हटला नाही.

पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात अनेकदा आरोपी सुटतात, पण अलिबागच्या या निकालानं अशी गुन्हेगार मानसिकता धक्का बसला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 323 अंतर्गत दिलेल्या या शिक्षेमुळे पत्रकारांवर हल्ला करणे हे ‘दंडनीय गुन्हा’ असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

पत्रकार हर्षद कशाळकर यांच्या चिकाटी, धैर्य आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मिळालेला हा निकाल राज्यातील पत्रकारांसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. यानंतर राजकीय नेत्यांना पत्रकारांवर हात उगारताना हजारदा विचार करावा लागेल — हा या प्रकरणाचा सर्वात मोठा संदेश आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *