शिक्षणाचा आलेख उंचावतोय! महाराष्ट्रातील शाळा डिजिटल युगाच्या दिशेने पुढे

          प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) ‘असर’ अहवाल प्रकाशित केला असून, त्यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. अहवालात २०.४% विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील ७२.९५% शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे.
          अहवालानुसार ४८.३% शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण १,०८,१४४ शाळांपैकी ७८.४% शाळांमध्ये संगणक उपलब्ध आहे. तसेच, ९६.८% शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सोय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रथम फाउंडेशनने केवळ ८७२ ग्रामीण शाळांचे सर्वेक्षण केले असून, हा आकडा राज्यातील एकूण शाळांच्या केवळ ०.८१% इतकाच आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता, राज्यातील २,०९,६१,८०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण झाले असून, ते फक्त ०.१६% विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते.
शिक्षणात महाराष्ट्राचा पुढाकार
• शासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या: वय वर्ष ६ ते १४ गटातील ६०.९% विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये, तर ३८.५% विद्यार्थी खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत      आहेत.
•वाचन आणि गणितीय कौशल्यांची प्रगती: इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता व संख्याज्ञान सुधारत असून, कोविडमुळे झालेला अभ्यासाचा घट भरून काढला जात       आहे.
• शासकीय शाळांमध्ये वाचन कौशल्यात १०.९% वाढ, खासगी शाळांमध्ये ८.१% वाढ
• गणितीय कौशल्यात शासकीय शाळांमध्ये १३.१% वाढ, खासगी शाळांमध्ये ११.५% वाढ
• महाराष्ट्राची देशपातळीवरील प्रगती:
• इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य देशाच्या तुलनेत १०% अधिक
• गणितीय प्रगतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये
• २०२२च्या तुलनेत २०२४मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीत १३% वाढ.
          वय वर्ष १४ ते १६ गटातील ९४.२% विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे, तर ८४.१% विद्यार्थी तो वापरू शकतात. त्यातील १९.२% विद्यार्थ्यांकडे स्वतःचा स्मार्टफोन असून, ६३.३% विद्यार्थी शिक्षणासाठी स्मार्टफोनचा उपयोग करतात.
पटनोंदणी आणि शाळाबाह्य मुलांचे प्रमाण
• ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर ८ वर्षांपासून ९९% पेक्षा जास्त
• २०२४ मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी नोंदणीचे प्रमाण ९५%
• शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ ०.४%, तर देशभरात हे प्रमाण १.९%
या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते की, महाराष्ट्राचा शिक्षण स्तर सातत्याने उंचावत असून, राज्य शिक्षणाच्या डिजिटल युगाकडे वेगाने वाटचाल करत आहे.
Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *