राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी दोन महिन्यांसाठी राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून पूर्ण विश्रांती घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहिले आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले.
डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलेल्या राऊतांनी आज मात्र खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त हा सल्ला मोडला. दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला अभिवादन करण्यासाठी ते सकाळी अचानक घराबाहेर पडले. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांनी मास्क परिधान केला होता. शिवाजी पार्कला पोहोचल्यावर राऊत आपल्या बंधू सुनील राऊत यांच्या मदतीने स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि बाळासाहेबांना अभिवादन केले.
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून संजय राऊत हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरा बनले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटली तरी राऊत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मात्र मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना अचानक गंभीर आजाराचे निदान झाल्याने त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.


Leave a Reply