मुंबईतील क्रिकेट आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा शिवाजी पार्क जिमखाना (SPG) नूतनीकरणानंतर सोमवारी पुन्हा सुरु झाला. या ऐतिहासिक क्षणाला क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. त्यांनी रिबन कापून जिमखान्याचे उद्घाटन केले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या गगनभेदी टाळ्यांचा वर्षाव झाला.
सचिन तेंडुलकरांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, महेश सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सचिन यांनी या प्रसंगी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले, “मी इथे माझे बालपण घालवले आहे. आम्ही वडापाव खायला यायचो. आज जिमखाना नव्या रुपात सजला आहे. यात अनेकांचा वाटा आहे. विशेषतः राज ठाकरे यांनी परवानग्या मिळवून देणे आणि डिझाईनमध्ये सहभाग घेणे यात महत्त्वाची भूमिका बजावली.”
गेल्या दीड वर्षांपासून नूतनीकरणामुळे बंद असलेला हा जिमखाना आता नव्या रुपात सज्ज झाला आहे. आतील सजावटीत विंबल्डन ग्रीन आणि बेज रंगांचा वापर करण्यात आला असून वारसा जपून आधुनिक लुक देण्यात आला आहे. जिमखान्याला १९ सप्टेंबर रोजी ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले आणि केवळ तीन दिवसांत तो सभासदांसाठी खुला करण्यात आला. सध्या सुमारे ३,००० कुटुंबे या जिमखान्याची सदस्य आहेत.
नूतनीकरणानंतर महिला क्रिकेट संघाची स्थापना हा मोठा बदल ठरणार आहे. महिला खेळाडूंकरिता स्वतंत्र ड्रेसिंग रूम आणि शौचालयांची सोय करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.
१९०९ मध्ये न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब म्हणून सुरुवात झालेल्या या संस्थेने १९३१ मध्ये पहिले क्लब हाऊस सुरु केले आणि १९४२ मध्ये १९,००० चौरस यार्डांपर्यंत विस्तार केला. अनेक दिग्गज क्रिकेटपटू इथून घडले असल्याने या जिमखान्याला “नर्सरी ऑफ इंडियन क्रिकेट” म्हणून ओळखले जाते. सचिन तेंडुलकरांनी येथे कोच रामाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली. आज नव्या रुपातला जिमखाना भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यास तयार आहे.
Leave a Reply