मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत खलबतं सुरू आहेत. युवा नेते आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भास्कर जाधव यांच्या नावाला काही आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागू शकते. आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करावं, असं काही आमदारांचं म्हणणं आहे.
मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र भास्कर जाधवांच्या नावाला पक्षातील आमदारांनी विरोध दर्शवल्याचं सूत्रांनी सांगितले. भास्कर जाधव हे काही दिवसांपासून पक्षविरोधी वक्तव्य करत होते, त्यामुळेचं त्यांच्या नावाला विरोध झालं असावं, असं बोललं जातं आहे. ठाकरेंची शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा
मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी (ता.28) ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली. यावेळी काही आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असं ठाकरेंच्या काही नेत्यांचं मत आहे. शिवाय विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाचे पत्र दिल्यास विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या नावाला कोणतीही अडचण येणार नाही, असं या नेत्यांचं मत आहे. तर दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा आहे.
पक्षविरोधी वक्तव्यामुळे पत्ता कट?
जाधव हे मागील काही दिवसापासून पक्षाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधील बड्या नेत्यांची देखील आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply