बुलढाण्यात बोगस मतदार? आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर घणाघात

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती, स्थानांतरित अधिकारी यांची नावे अद्याप मतदारयादीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक आयोग बोगस नावे वगळण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

गायकवाड म्हणाले, “जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या अनेक व्यक्तींची नावे यादीत कायम आहेत. स्थलांतरित अधिकाऱ्यांची नावेही अजून वगळलेली नाहीत. मी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार बोगस मतदारांची यादी दिली आहे, पण कारवाई झालेली नाही. उलट आयोगाने ही नावे काढू नका, अशी भूमिका घेतली आहे.”

आमदार गायकवाड यांनी दुहेरी नोंदणीच्या प्रकरणावरही बोट ठेवले. अनेक मतदार ग्रामीण भागात राहतात; मात्र शहरी मतदारयादीत आपले नाव ठेवून दोन ठिकाणी मतदान करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी ही बोगस नावे तातडीने वगळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राजकीय समीकरणांबाबत बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात तिन्ही पक्षांची — शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित गट) — महायुती होण्याची इच्छा सर्व नेत्यांची आहे. बुलढाण्यातही युतीचा कल दिसतोय, मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले, “ते विध्वंसक प्रवृत्तीचे आहेत. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्षांनाही तोडण्याचं काम करत आहेत.” उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस पक्षाला ते मान्य नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *