राज्य सरकार महिला आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजनांचा राबवित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, उद्योजक धोरण योजना, महिला उद्योगिनी योजना अशा विविध योजनांनी महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने प्रोत्साहन दिलं आहे. आता, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुलींसाठी आणलेली एक नवीन योजना चर्चेचा विषय बनली आहे. ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ असं या योजनेचं नाव असून, याअंतर्गत मुलींच्या बँक खात्यावर 10,000 रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट जमा केले जाईल. ही योजना ट्रस्टने राज्य सरकारकडे सादर केली असून, लवकरच सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आणि सक्षमीकरणासाठी विविध प्रयत्न करणे आहे. यानुसार, महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावावर 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट त्यांच्या मातांच्या खात्यावर ठेवले जाईल. 8 मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावावर ही मुदत ठेव केली जाईल. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाल्याने ट्रस्टने 133 कोटी रुपये मिळवले आहेत. सन 2024-25 साठी ट्रस्टचे अपेक्षित उत्पन्न 114 कोटी रुपये होते, पण नियोजनामुळे ते 133 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. 2025-26 साठी अपेक्षित उत्पन्न 154 कोटी रुपये असं गृहीत धरले आहे.
Leave a Reply