मुंबई: मुंबईतील जुना ‘कर्नाक पूल’ आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ या नव्या नावाने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि सामर्थ्याला वंदन करण्याच्या उद्देशाने हे नामकरण करण्यात आले आहे.
नामकरणामागची भूमिका
अनेक वर्षांपासून ‘कर्नाक पूल’ हे ब्रिटिश गव्हर्नरच्या नावाने ओळखले जात होते. इतिहासातील वसाहतवादी खुणा पुसण्याच्या गरजेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भरानुसार हे नामकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, इतिहासात नोंद असलेल्या दाखल्यांनुसार, विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनातून, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. भारतीयांवर खोटे आरोप लादले गेले होते. त्यामुळे अशा वसाहतवादी नामकरणांचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नामकरणाचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता आणि त्याला प्रशासनाने मान्यता दिली.
नियोजित वेळेपेक्षा कमी कालावधीत काम पूर्ण
या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेचे कौतुक केले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीची कार्यवाही आव्हानात्मक असूनही अनेक अडथळ्यांवर मात करत महापालिकेने यशस्वीपणे हे काम पूर्ण केले, असे गौखवोदगार त्यांनी काढले.
अभियंत्यांचा सन्मान आणि मान्यवरांची उपस्थिती
पूल उभारणी कामात उल्लेखनीय योगदान दिलेल्या महापालिकेच्या अभियंत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे, कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहायक अभियंता कुणाल वैट, आणि दुय्यम अभियंते अभिषेक देवळेकर, नरेद्र पाडवी, कृपाल खोत आदींचा समावेश होता.
या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply