मुंबई : परभणीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांना आठ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पथकाची घोषणा केली.या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक (सीआयडी, पुणे) सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. तर सदस्य म्हणून मिलिंद भारंबे (पोलिस अधीक्षक, सीआयडी, नागपूर) आणि गजानन गायकवाड (पोलिस उपअधीक्षक, सीआयडी, नांदेड) यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांवर कठोर भूमिका घेत, चौकशीसाठी एसआयटीची गरज असल्याचे स्पष्ट केले. या आदेशाला आव्हान देण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, मात्र पुढील सुनावणीत खंडपीठाचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे अखेर शासनाला एसआयटी स्थापन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
दरम्यान, या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल करत सातत्याने न्यायासाठी लढा दिला होता. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. “सुप्रतिष्ठीतपणे एसआयटी स्थापन झाली आणि आमची मागणी योग्य ठरली हे समाधानकारक आहे. न्याय मिळवण्यासाठी हीच आमची लढाई आहे. लवकर चौकशी पूर्ण होऊन न्याय मिळावा,” अशी भावना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी व्यक्त केली.
Leave a Reply