मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास आता एसआयटी (विशेष तपास पथक) करणार आहे. आयपीएस अधिकारी पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखालील ही एसआयटी या प्रकरणाची चौकशी करेल. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह मुंडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाचा संपूर्ण वृत्तांत मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी तात्काळ बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
२९ ऑक्टोबर २०१३ रोजी महादेव मुंडे यांची परळी येथे हत्या झाली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलांचा सहभाग असल्याचा आरोप मुंडे कुटुंबीयांनी केला आहे. कराड गँगच्या इतर सदस्यांचाही यात हात असल्याचा आरोप आहे, परंतु अद्याप कुणालाही अटक झालेली नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, काही पोलीस अधिकारी या हत्येत सहभागी आहेत आणि त्यांची नावे मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय, त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराडने फोन केल्याचा उल्लेख करत, यात इतर कुणी सहभागी आहे का, याचा सीडीआर काढण्याची विनंतीही केली.
Leave a Reply