ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या बद्दल फार कमी बोलले जाते. त्यांचे साहित्यही फारसे उपलब्ध नाही. स्वतः शैवमार्गीय नाथ संप्रदायातील असूनही आपल्या अभंगाच्या शेवटी श्रीकृष्णाची नाममुद्रा घेणारे निवृत्तीनाथ महाराज खूपच बंडखोर होते. ज्यांना शैव – वैष्णव वाद आणि त्यातून आजवर घडत असलेले संघर्ष ठाऊक आहेत, त्यांना निवृत्तीनाथ महाराज यांनी केलेले धाडस किती मोठे होते, याची कल्पना येईल. तर अशा या वाळीत टाकलेल्या, अस्पृश्यता भोगलेल्या किशोरवयीन निवृत्ती – ज्ञानदेवांनी, त्यांच्यापेक्षा दहाएक वर्ष मोठ्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या साथीने कर्मकांडाला फाटा देत सर्वसमावेशक धर्ममार्ग प्रशस्त केला. ज्या काळात मद्य,मांस, मैथुनाला धार्मिकतेचे वलय देणारा तंत्र मार्ग फोफावत होता, त्याकाळात, आमच्या वारकरी संतानी ” हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी ” असे सांगून . “नलगती सायास जावे वनांतरा” या शब्दात भाविक लोकांना घरच्या घरी भगवंत भेटीचे आश्वासन दिले. ज्यांना पटत नव्हते, त्यांना थेट सुनावले की, ” योग याग विधी, येणे नोहे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म” थोडक्यात सांगायचे तर, या ज्ञानमार्गी संतांनी आपल्या मराठी समाजावर अफाट उपकार करून ठेवले आहेत. त्यातही आम्हाला सगळ्यात जास्त ऋणी राहिले पाहिजे निवृत्तीनाथ माऊलींचे. हो, मला आपल्या ज्ञानोबा माऊलींचे माय-बाप होऊन, स्वतः मागे राहणारे निवृत्तीनाथ महाराज आद्य माऊली वाटतात. त्यांना अडाणी मराठी लोकांची दया आली, म्हणून त्यांनी आपली फक्त शिष्यांना देण्याची “ज्ञान शिदोरी”, समस्त मराठी लोकांना वाटून दिली. आपण जर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला परंपरेचा अभंग वाचला तर लक्षात येते की, गुरुने आपले ज्ञान फक्त शिष्याला देण्याची नाथ संप्रदायातील गुरू – शिष्य परंपरा होती. पण निवृत्तीनाथांनी काळाची पावलं ओळखून, अवघा समाज ज्ञानी करण्यासाठी, ज्ञानेश्वरांना संस्कृतमधील धर्मज्ञान मराठीतून देण्याचा “आदेश” दिला. त्यासाठी धर्ममार्तंड ब्राह्मणांचा रोष पत्करला… पण अवघा मराठी समाज सुशिक्षित केला… निवृत्तीनाथांच्या आधी तसे होत नव्हते. हे पुढील परंपरेचा अभंग वाचल्यावर समजते आणि म्हणून त्यांच्या विषयीची कृतज्ञता दाटून येते…
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। १।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजविले ।।३।।
तर असे हे महान योगी, ज्ञानी आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज आणखी एका अर्थाने थोर ठरतात, कारण त्यांनी कष्टाने गुरुगृही मिळवलेले ज्ञान आपल्या धाकट्या भावाला आईच्या मायेने “चोजविले”. पक्षिणी जेव्हा आपल्या चोचीतून पिलांना अन्न भरवते, त्याला चोजवणे म्हणतात… तर या नावाप्रमाणे निवृत्तीही-नाथ महाराजांनी ज्ञानोबा माऊलींचे उदारपणे ” ये हृदयीचे, ते हृदयी” घालून भरणपोषण केले. म्हणून मराठी समाज सर्वसमावेशक, उदार आणि ज्ञानमार्गी बनला. अवघ्या देशात आपल्या मराठी लोकांकडे असलेले वेगळेपण पाहायला मिळत नाही. कारण आपल्यावर जे वैचारिक संस्कार आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही घडलो आहोत. ज्ञानोबा माऊलींचे शब्द जसे आम्हाला “जे जे दिसे भूत (प्राणी) ते ते मानीजे भगवंत” असा उदार विचार करायला सांगतात. तद्वत तुकाराम महाराजांच्या अभंग शब्दांनी “भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी” ही शिकवण दिली आहे. म्हणून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात “शक्ती” आणि संतांच्या विचारातून “भक्ती”चे अगणित धबधबे वाहत असतात. त्यातूनच देशातील पहिली शाळा काढणारे महात्मा फुले दांपत्य ज्ञानगंगा प्रवाहित करतात. आगरकर सामाजिक सुधारणांचा प्रवाह गतिमान करतात. शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महर्षि कर्वे, न्या. रानडे, लोकमान्य टिळक असे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्र घुसळून काढणारे महापुरुष महाराष्ट्रात जन्माला आले… कारण या भूमीची मशागत ज्ञानमार्गी संत विचारांनी केली होती… ज्याचे प्रवर्तक होते संत निवृत्तीनाथ महाराज… आज अवघा महाराष्ट्र जरी या उदार महापुरुषाला विसरला असला, तरी भविष्यात कोणीतरी तरुण अभ्यासक निवृत्तीनाथांचा त्र्यंबक मठ आणि अभिनवगुप्त यांची काश्मिरी शैव परंपरा याचा सखोल अभ्यास करेल. तेव्हा आपल्याला खरे निवृत्तीनाथ महाराज कळतील, अशी आशा आहे.
आज गुरु प्रतिपदा आहे आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्मदिवस.
या माऊलींच्या माऊलींना जयंतीच्या निमित्ताने मनःपूर्वक नमस्कार.
महेश म्हात्रे


Leave a Reply