सांगली : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटातील प्रसंग प्रत्यक्षात साकारल्यासारखी घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रतिष्ठित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचा बनावटी छापा टाकून अज्ञात टोळक्याने तब्बल दोन कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणाने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार जण स्वतःला आयकर अधिकारी म्हणून म्हेत्रे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी अधिकृत वॉरंट दाखवत झडती सुरू केली. या कारवाईत घरातील १६ लाख रुपयांची रोकड, किलोभर सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्याचे सांगत आरोपींनी सारा माल घेऊन पलायन केले. सुरुवातीला म्हेत्रे यांना हे अधिकारी खरेच वाटले. परंतु काही वेळानंतर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत हा संपूर्ण छापा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी डॉक्टरांची सविस्तर चौकशी केली असून आरोपींनी अत्यंत शिताफीने ही लूट केल्याचे दिसून आले. घटनेनंतर शहरातील डॉक्टरांनी म्हेत्रे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. दीक्षा भोयर यांनी सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे कुणाला गंडा घालण्यात आला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी सावधगिरीचे आवाहन केले आहे.
Leave a Reply